टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार केला आहे. यामुळे राज्यातील बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच टाटा इन्स्टिट्यूटने राज्यातील सुमारे साडेतीन हजार उद्योगांसोबत सामंजस्य करार केला आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षणाच्या संधी बरोबरच स्थानिकस्तरावरही रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या ‘स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे यूजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी ‘कमवा व शिका’ या तत्त्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकणार आहे.
(हेही वाचा – मध्य रेल्वेचा दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, कसं असणार गाड्यांचं वेळापत्रक)
या संस्थेने अभ्यासक्रमाकरिता ३ हजार ७५० उद्योगांसोबत करार केला असून, विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा जॉबरोल निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अॅग्रिकल्चर, ऑटोमोटिव, चाइल्ड केअर, इलेक्टॉनिक्स, लाइफ सायन्स, रिटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अॅन्ड आंत्रेप्युनरशिप, टुरिझम अॅन्ड हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, मीडिया व एंटरटेन्मेंट, बँकिंग व वित्तीय क्षेत्र यामधील संधींचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community