दिनांक 19 जून 1966 याच दिवशी शिवसेनेचा जन्म झाला आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नावाच झंझावात सुरु झाला. सुरुवातीला शिवसेना फक्त एक संघटना होती. त्यामुळे तिचा राजकीय पक्ष होईल आणि तो पक्ष राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. पण, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी उभी राहिलेली ही संघटना हळूहळू वाढू लागली आणि वर्षभराच्या आतच शिवसेनेने राजकारणात उडी घेतली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे गणित बांधले. मुंबईसह उपनगरांत पक्ष घराघरांत पोहोचला. प्रत्येक मुंबईकराला हा पक्ष आपला वाटू लागला कारण, इथे त्यांच्या समस्या ऐकल्या जात होत्या. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे नावाचे वलय निर्माण झाले. परंतु सुरुवातीला शिवसेनेकडे निवडणूक चिन्ह नव्हतं. त्यामुळे जेव्हा केव्हा शिवसेनेने निवडणूक लढवली तेव्हा त्यांना कधी ढाल- तलवार, कप-बशी, रेल्वे इंजिन, कधी नारळ,उगवता सूर्य तर कधी झाड अशी चिन्हे मिळाली.
परंतु, 1988 साली केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक पक्षांची नोंदणी सुरु केली आणि शिवसेनेने आपला प्रस्ताव पाठवला. पण तोपर्यंत अपेक्षित मतांची टक्केवारी नसल्याने, शिवसेनेला कोणतेही चिन्ह मिळाले नाही. अखेर 1989 साली शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लोकसभेच्या तीन जागा लढवल्या आणि शिवसेनेचा एकच उमेदवार निवडून आला. पण शिवसेनेने अपेक्षित मतांची टक्केवारी पूर्ण केली. तेव्हाच शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले.
धनुष्यबाण हेच चिन्ह का?
शिवसेना पक्षाची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. धनुष्यबाण म्हणजे प्रभू श्रीरामांचे शस्त्र असे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या उत्साहात धनुष्यबाणाचे स्वागत केले आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यावर बाण दिसू लागला. बाळासाहेब ठाकरेंनंतर हाच धनुष्यबाण शिवसेनेची ओळख बनला आणि त्यासोबत होता डरकाळी फोडणारा वाघ आणि भगवा झेंडा.
Join Our WhatsApp Community