निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आणि पक्षाचे नाव वापरण्यावरही आयोगाने मनाई केली. यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह देखील गेल्याच्या चर्चा आणि प्रतिक्रिया सर्वच स्तरातून येतांना पाहायला मिळाल्या. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपला जबाबदार धरून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
(हेही वाचा – शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले…)
जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ४० डोक्याच्या रावणाने प्रभू रामाचे शिवधनुष्य गोठवले. त्यानंतरही हेच म्हणतात की, बघा आम्ही करून दाखवले. काय मिळवले त्यांनी शिवसेना फोडून? ज्या शिवसेनेने मराठी अस्मिता जपली ती फोडायला निघालात तुम्ही. हे करण्यासाठी थिजलेली मने आणि गोठलेले रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेले डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचे आणि उलट्या काळीज असणाऱ्यांचे इथे कामच नाही. यांनी धनुष्यबाणच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची हिंदू मतं तुम्ही गोठवली. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. वडीलांनी ती वाढवली आता या नावाशी तुमचा संबंध काय? तुम्ही या नावाचा आणि शिवसेनेचा घात केला असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर चांगलाच शाब्दिक हल्ला केला.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे आती होतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे कधी संतप्त होताना दिसत नाही. मात्र आज त्यांनी आता बास म्हणत सूचक विधान देखील केल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community