ठरलं तर आता राज ठाकरे अयोध्येला जाणारच! अयोध्येतील महंतांकडून राज यांना निमंत्रण

124

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मस्जिदवरच्या भोंग्यांवरून त्यांनी जाहीर भाषणातून आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान ते अयोध्येच्या दौऱ्यावरही जाणार होते, मात्र उत्तरप्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध केला होता. राज ठाकरेंनी आधी उत्तर प्रदेशामधील लोकांची माफी मागावी त्यानंतरच त्यांनी अयोध्येला यावं, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होते. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा- शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)

समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंना अयोध्येला बोलावण्यासाठी अयोध्येतील हनुमान गढी महंत राजुदास महाराज, महंत धरमदास, विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी हे मुंबईत आले आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी या सर्व महंतांनी राज यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज ठाकरेंशी आमची भेट झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आम्ही त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहेत. याभेटी दरम्यान, राज ठाकरेंनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी अयोध्येला येणार होतो. पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही. पण मी आता येणार आहे, असे आश्वासन दिल्याचे महंत राजुदास महाराज यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागच्या वेळी काही गैरसमज झाल्याने भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यावेळी तसे काही होणार नाही. सगळे गैरसमज दूर झाले आहेत. राज ठाकरे सनातन धर्माच्या पुढे जात आहेत. म्हणून त्यांना अयोध्येला बोलवायचे आहेत, असेही राजुदास महाराज यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.