केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी दिली.
(हेही वाचा – राणा म्हणताय, “…म्हणून श्रीरामांनीच उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हिसकावून घेतला”)
या निवडणुकीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. १७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२२ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे, अशीही माहिती चौधरी यांनी दिली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास…
या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला वृत्तपत्रे किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उमेदवाराची प्रसिद्धी करावयाची असल्यास ती जाहिरात व विहित नमुन्यातील फॉर्म ‘माध्यम संनियंत्रण व प्रमाणन समिती’ कडे सादर करून प्रमाणित करून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community