परतीच्या पावसाला पुढच्या आठवड्याचा मुहूर्त

144

ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरीही राज्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. संपूर्ण राज्यातून १५-१६ ऑक्टोबरदरम्यान नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरतात. परंतु राज्यात अद्यापही पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत असल्याने परतीच्या पावसाबाबत नेमकी कल्पना तीन किंवा चार दिवसांनीच स्पष्ट होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिली.

दक्षिण भागांतही परतीचा पाऊस सक्रीय

सोमवारी सायंकाळी बराच वेळ पुण्यात परतीच्या पावसाने पुणेकरांना भिजवले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही तासांसाठी पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही हलक्या पावसाच्या सरी सुरु आहेत. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अद्यापही पोषक वातावरण नसल्याचे होसाळीकर यांनी स्पष्ट केले. देशाच्या उत्तर तसेच दक्षिण भागांतही परतीचा पाऊस सक्रीय आहे. त्यामुळे राज्यातून नैऋत्य मोसमी वारे परतण्याबाबत आता काहीच ठाम बोलता येत नसल्याचे होसाळीकर यांनी सांगितले.

(हेही वाचा दुकानांच्या पाट्या सात दिवसांमध्ये बदला : महापालिकेची दुकानदारांना अंतिम संधी अन्यथा होणार सोमवारपासून थेट कारवाई)

ब-याचशा भागांतून पाऊस परतलेला नाही

सोमवारी केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार, देशाच्या वायव्य आणि मध्य भारतातून मान्सून परतायला तीन ते चार दिवसांनी पोषक वातावरण तयार होईल. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि महाराष्ट्र हे राज्य मध्य भारतात गणले जातात. आठवड्याभरापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतून परतीचा पाऊस माघारी परतला होता. त्यानंतर उत्तर तसेच मध्य भारतात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आठवड्याभरापासून परतीच्या पावसाचा मार्ग रेंगाळला आहे. उत्तराखंड आणि बिहार राज्यातील ब-याचशा भागांतून पाऊस परतलेला नाही. त्यातच उत्तर आणि दक्षिण भारतात पावसासाठी पोषक वातावरण दिसून येत आहे. राज्यातही बुधवारपर्यंत पावसाची हजेरी सुरु राहील, त्यामुळे तीन-चार दिवसानंतर महाराष्ट्रातून परतीच्या पावसाबाबत नेमकी कधी सुरुवात होईल, याचा अंदाज वर्तवणे योग्य राहील, असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.