शिवसेनेच्या शिंदे गटाला विधिमंडळ पक्ष कार्यालय म्हणून मंत्रालयासमोरील ‘ब्रह्मगिरी’ हा बंगला देण्यात आला आहे. शिवसेनेचे विधिमंडळातील मूळ कार्यालय उद्धव ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे विधिमंडळात एका पक्षाची दोन स्वतंत्र कार्यालये झाली आहेत.
शिंदे गटाकडे विधिमंडळात ४० सदस्य आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडे दोन्ही सभागृहात मिळून २७ सदस्य आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गटांना विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. ठाकरे गटाचे मंत्रालयासमोरील बंगल्यात ‘शिवालय’ नावाने पक्ष कार्यालय आहे. आता शिंदे गटाचे कार्यालय ब्रह्मगिरी (क-१) येथे असेल. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच त्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.
…तेव्हा शिंदेंनी सांगितला होता दावा
विधिमंडळात पक्षाच्या सदस्यांसाठी एक स्वतंत्र कार्यालय देण्यात येते. शिवसेनेचे कार्यालय विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावर असून, विश्वासदर्शक ठरावाच्या अधिवेशनात शिंदे गटाने त्यावर दावा सांगितला होता. मात्र, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आदेशानुसार त्या कार्यालयावर उद्धव गटाचा अधिकार कायम राहिला. तर पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाला ७व्या मजल्यावर तात्पुरत्या स्वरूपात दोन दालने देण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community