गोरेगाव येथील फिल्मसिटीत सापडला बिबट्याचा बछडा

182

गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याचा बछडा सापडला. फिल्मसिटीच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या जागेवर बिबट्याचा बछडा सुरक्षारक्षकांना आढळून आला. या बछड्याला सध्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारांसाठी ठेवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास फिल्मसिटीतील प्रवेशद्वाराजवळील भागांत सुरक्षारक्षकांना जोरजोरात कुत्री भुंकत असल्याचा आवाज आला. सुरक्षारक्षकांनी जागेची पाहणी केली असता त्यांना बिबट्याचा बछडा सापडला. याबाबत सुरक्षारक्षकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनाधिका-यांना कळवले. वनाधिका-यांच्या टीमने बछड्याला घेऊन उद्यान परिसरात तपासणीसाठी आणले. बिबट्याला पशुवैद्यकीय अधिका-यांनी तपासल्यानंतर महिन्याभराचा बछडा अशक्त असल्याचे समजले.

(हेही वाचा – National Post Week 2022: सहा महिन्यांत महाराष्ट्र पोस्टाची ५०० कोटींची कमाई)

तासाभरानंतर घटनास्थळी सुरक्षारक्षकांना बिबट्याचा वावर दिसून आला. बछड्याला शोधण्याासाठी त्याची आई आली असावी, असा अंदाज सुरक्षारक्षकांनी बांधला. बछड्याला तातडीने औषधे व अन्न प्राणीरक्षकांनी देत उपचार सुरु केले. रात्री उशिरा बछड्याचे आणि आईचे मिलन करण्याचा निर्णय वनाधिका-यांनी घेतला. परंतु घटनास्थळी मादी बिबट्या न आल्याने आई व बछड्याचे मिलन होऊ शकले नाही.

सध्या बिबट्याला उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी ठेवले गेले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा बछड्याची आईशी मिलन घडवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्व घटनाक्रमाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.