राज्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील रुग्णांना होणा-या त्रासाची दखल घेत खटले दाखल करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाच्या रचनेत वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने मोठा बदल केला आहे. मंडळावर नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने जुन्या सदस्यांच्या गटाला वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. नव्या सदस्यांच्या नियुक्तीपर्यंत जेजे समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाची धूरा सांभाळतील.
डॉ. पल्लवी सापळे प्रशासक म्हणून नियक्ती
सोमवारी उशिरा वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने परिपत्रकाच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली. वैद्यकीय दुर्लक्षिततेच्या खटल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या सदस्यांना पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडले जाते. सध्या कार्यरत असणा-या सदस्यांचा कार्यकाळ ७ ऑगस्टलाच संपला होता. नव्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवडणूक घ्यावी लागते. निवडणूकीबाबत अद्यापही निर्णय होणे बाकी असताना जुन्या सदस्यांचे कार्यकारी मंडळ बरखास्त करत प्रशासक नेमण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने घेतला. नव्या कार्यकारिणी मंडळांच्या नियुक्तीकरिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डॉ. पल्लवी सापळे प्रशासक म्हणून महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाचे काम पाहतील. येत्या दोन दिवसांत डॉ. सापळे प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारतील. डॉ. सापळे यांना जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाच्या कामासह अतिरिक्त कार्यभार म्हणून महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाचे काम पाहावे लागेल.
Join Our WhatsApp Community