पहिल्याच दिवशी दुकानांच्या झाडाझडतीत २५ टक्के पाट्या मराठी विना

174

मुंबईतील दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत अर्थात मराठी भाषेत करण्यासाठी सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना आजवर देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष सुरु झालेल्या झाडाझडतीमध्ये पहिल्याच दिवशी २,१५८ दुकानांच्या नामफलकांची पाहणी करण्यात आली. यामध्ये सुमारे २५ टक्के नामफलक हे मराठी भाषेत नसल्याचे आढळून आले आहे. मराठी भाषेत नामफलक नसल्याने ५२२ दुकानांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.

( हेही वाचा : शिवसेनेच्या इतिहासात ढाल-तलवार चिन्हाचे काय आहे महत्व?)

दुकानांचे नामफलक मराठीतून करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून मुंबईतील २४ विभागांमधील दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैंकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सोमवारपासून प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण मुंबईतील २ हजार १५८ दुकानांना भेटी देण्यात आल्या. त्यातील १६३६ ठिकाणच्या दुकानांवर मराठी नामफलक आढळून आले, उर्वरीत ५२२ ठिकाणी मराठी नामफलक नसल्याचे आढळून आले, याबाबत संबंधित नियम आणि पद्धतीनुसार नोटीस देण्यात आल्याचे उपायुक्त(विशेष) संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. या नोटीसनंतरही दुकानदारांनी नामफलक मराठी भाषेत न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.