घरातील दागिने ‘जीन’ (आत्मा) घेऊन जात असल्याचे समजून त्याने सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाण्यास टाळाटाळ केली, मात्र घरातील रोख रक्कम गायब होऊ लागल्यामुळे त्याने अखेर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात दागिने, रोख रक्कम चोरी करणाऱ्याचे नाव पुढे येताच त्याला धक्काच बसला.
घरातील दागिने आणि रोकड असा एकूण ४० लाख रुपयांचा ऐवज गायब करणारी जीन (आत्मा )नसून त्याची स्वतःची १३ वर्षांची भाची निघाली. या १३ वर्षाच्या भाचीने तिचा प्रियकर असलेला २२ वर्षाच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून थोडी थोडी करून ही रक्कम मामाच्या घरातून चोरून प्रियकराला दिली होती. भायखळा येथे घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी १३ वर्षाच्या मुलीचा प्रियकर आणि त्याचे दोन मित्र असे एकूण तिघांना सुरत येथून अटक केली आहे. या तिघांकडून चोरलेला सर्व ऐवज आणि रोकड पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली.
भायखळा येथील म्हतारपाखडी या ठिकाणी अब्दुल कादर गोधावाला (४०) हे व्यवसायिक कुटुंबियांसह राहण्यास आहे. सुरत येथे राहणारी त्यांची बहीण आणि मेहुणा हे दोघे नोकरीसाठी परदेशात असल्यामुळे बहिणीच्या १३ वर्षांच्या मुलीचा सांभाळ अब्दुल कादर गोधावाला करीत होते, त्यांची भाची त्यांच्यासोबत भायखळा येथे राहत होती. गोधावाला हे भाचीचा मुलीसारखा सांभाळ करीत होते, गोधावला यांच्या बहिणीचे इतर नातलग सुरत येथे राहण्यास होते. त्या नातलगामधील २२ वर्षाच्या तरुणासोबत १३ वर्षाच्या मुलीचे प्रेमप्रकरण सुरू होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
( हेही वाचा: लोकलने प्रवास करणा-या महिलांसाठी मोठी बातमी; लोकलमध्ये महिला डबे वाढवले )
गोधावाला यांच्या घरात असलेले सोन्याचे दागिने घरातून अचानक गायब होण्याचा प्रकार फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाला. दागिने कुठे गेले याचा पत्ता लागत नव्हता. घरातील दागिने एक एक करुन गायब होऊ लागले, घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे घरातील बुजुर्ग व्यक्तीला हे दागिने ‘जीन’ (आत्मा) घेऊन जातो असा समज झाला व त्यांनी अब्दुल कादर गोधावला यांना तसे सांगितले. घरातील एकंदर वातावरण धार्मिक असल्यामुळे खरोखर असं होत असेल याच्यावर विश्वास ठेवून गोधावाला यांनी पोलीसांत तक्रार देणे टाळले.
सप्टेंबर महिन्यात पुन्हा सोने आणि १० लाख रुपयांची रोकड गायब झाल्यामुळे गोधावला यांना संशय येऊ लागला. जीन दागिने घेऊन जाऊ शकतो, रोकड नाही म्हणून अखेर त्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवले. भायखळा पोलीस ठाण्यात त्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने अशी एकूण ४० लाख १८ हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुहास माने, पो.उ.निरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार दशरथ सोनवणे, संजय जाधव, पोलीस शिपाई पाटील, राठोड, जाधव, सताळकर, जगताप या पथकाने तपास सुरू केला.
तपास पथकाने घरातील प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी सुरू केली, घरातील लहान मोठ्यांची चौकशी करत असताना तपास पथकाला गोधावाला यांच्या १३ वर्षाच्या भाचीवर तिच्या वागण्यावरून संशय आला. तपास पथकाने १३ वर्षाच्या भाचीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तीने हे दागिने आणि रोकड थोडी थोडी करून काढून सुरत येथे राहणाऱ्या प्रियकर असलेल्या नातलगाला दिल्याचे सांगितले. चोरीची पहिली कडी सुटली होती, चोरीची दुसरी कडी होती सुरत येथील तिचा प्रियकर नातलग, परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच त्याने सुरत येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस पथकाने बिलीमोरा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हयाची कबुली दिली व आपल्या सांगण्यावरून १३ वर्षाची नातलग असणारी प्रेयसी थोडे थोडे करून हे दागिने घेऊन मी सांगितलेल्या ठिकाणी भेटायला यायची आणि ते दागिने घेऊन मी निघून जायचो. यामध्ये दोन मित्रांनी मला मदत केल्याचीही कबुली त्याने पोलिसांना दिली. तपास पथकाने या दोन मित्रांनादेखील अटक करून तिघांजवळून चोरीचे दागिने आणि रोख रक्कम असा ४० लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे अशी माहिती वपोनि. खोत यांनी दिली.