नाशिकमधील बस दुर्घटनेची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसने पेट घेतला. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मागच्या काही दिवसांत बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.
( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करणं ठाकरे गटांतील ‘या’ नेत्यांना भोवलं, ७ जणांवर गुन्हा )
…आणि अनर्थ टळला
पुण्यात आग लागलेली खासगी बस ही भीमाशंकर इथे जाणारी होती. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ या बसने पेट घेतला. या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाॅर्ट सर्किटमुळे या बसने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बसमध्ये लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झाले आहे. बसमधील सीट, काचा आणि आतील बाजूचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. बसमध्ये आग लागतेय हे लक्षात येताच प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. बस रस्त्याच्या एका कडेला उभी करण्यात आली. त्यामुळे थोडक्यात अनर्थ टळला.
Join Our WhatsApp Community