मुंबईत सध्या सुरु असलेल्या कुष्ठरोगांच्या शोध मोहिमेत आतापर्यंत ६० नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वात जास्त रुग्ण गोवंडी आणि चेंबूरच्या काही भागांत (एम -पूर्व विभाग) दिसून आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. कुष्ठरोगाचे नवे रुग्ण शोधण्याची मोहिम पालिका आरोग्य कर्मचा-यांनी २६ सप्टेंबरपासून सुरु केली. १० ऑक्टोबरपर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती उघडकीस आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत ५० कुष्ठरोगी सापडले. २०२१ आणि २०२२ या चालू वर्षात सुरु असलेल्या कुष्ठरोग्यांच्या सर्व्हेक्षणात यंदा कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. यंदाच्या वर्षांतील कुष्ठरोगांचे सर्व्हेक्षण मुंबईतील काही भागांत १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. परिणामी, हा आकडा अजून वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
चेंबूर, गोवंडी, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, ओशिवरा, भांडूप हे कुष्ठरोगाचे नवे हॉटस्पॉट ठरले आहेत. चेंबूर, गोवंडी खालोखाल कांदिवली आणि अंधेरीत कुष्ठरोगाचा प्रसार होत असल्याचे पालिकेच्या सर्व्हेक्षणात दिसून आले. कांदिवली (आर-दक्षिण) विभागांत ८ नवे कुष्ठरोगी पालिका अधिका-यांना सापडले. कांदिवली येथील ठाकूर संकुल, ठाकूर व्हिलेज, लोखंडवाला संकुल, कांदिवली पश्चिमेतील एम.जी.रोड, पटेल नगर, मथुरदास मार्ग या परिसरांतील उच्चभ्रू वसाहतींमध्येही कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले आहेत. या भागांत चौपटीने कुष्ठरोगांची संख्या वर्षभरात वाढली. अंधेरीतील (के-पूर्व विभाग) अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी पूर्वेतील भागांत ८ नव्या रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे के-पश्चिम विभागांशी संलग्न असलेल्या अंधेरी (पश्चिम) आणि ओशिवरात पहिल्यांदाच ७ नवे रुग्ण आढळून आले. तर भांडूपमध्येही ६ नव्या रुग्णांची भर पडली. एकंदरीत संपूर्ण मुंबईच्या तुलनेत दक्षिण मुंबईत कुष्ठरोगाचा प्रसार कमी झाल्याचे यंदाच्याही आकडेवारीतून पुन्हा सिद्ध झाले आहे.
(हेही वाचा गुरुंचे निधन झाल्याचे कळूनही निखिल लढला हिंमतीने, बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले)
पाचपेक्षाही कमी कुष्ठरोगाचे रुग्ण आढळलेले विभाग
आर -उत्तर आणि एल विभागात प्रत्येकी ४ कुष्ठरोगी पालिकेच्या सर्व्हेक्षणात सापडले. संपूर्ण आर उत्तर भागांत मोडणारा दहिसर तर एल विभागातील कुर्ला, चांदिवली, साकीनाका, तुंगा तसेच पवईतील काही भागांत मिळून एकूण आठ कुष्ठरोग्यांचा शोध लावण्यात पालिका आरोग्य विभागाला यश आले. दक्षिण मुंबईतील सी, डी, एफ-उत्तर, एम-पश्चिम, आर-मध्य या विभागांत प्रत्येकी दोन नवे रुग्ण सापडले. माहूल आणि चेंबूरच्या काही भागांत गेल्या वर्षांत ७ कुष्ठरोगी सापडले होते. त्यातुलनेत एम-पश्चिम विभागांत आता दोनच कुष्ठरोगी दिसलेत. तर सी आणि एफ-उत्तरेत यंदा पहिल्यांदाच कुष्ठरोगी सापडलेत. एच पूर्व आणि पश्चिम, ई विभाग विभागात पहिल्यांदाच प्रत्येकी एक कुष्ठरोगाचा रुग्ण आढळला. जीएन विभागात दोन्ही वर्षांत एक रुग्ण सापडला.
कुष्ठरोग मुक्त असलेले विभाग
ए, बी, एफ-दक्षिण, जी-दक्षिण, एन, टी, पी-उत्तर, पी-दक्षिण
गेल्या वर्षाची आणि यंदाची आकडेवारी
विभाग २०२१ सालाची आकडेवारी, यंदाच्या चालू वर्षांतील आकडेवारी (१० ऑक्टोबरपर्यंत)
- एम-पूर्व विभाग २०२१ – १३, २०२२ – ९
- आर-दक्षिण २०२१ – २, २०२२- ८
- के-पूर्व २०२१ – १०, २०२२ – ८
- के -पश्चिम २०२१- ०, २०२२ – ७
- एस २०२१- ०, २०२२- ६