प्रतिज्ञापत्र प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार – सूत्र

151
शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात गुन्हे शाखेने ४ वेगवेगळी पथके तयार केली असून एक पथक तपासकामी कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. इतर पथके वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रतिज्ञापत्र संदर्भात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. हजारोच्या संख्येने पोलिसांनी जप्त केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे  शिवसेना ठाकरे गटाच्या अडीचणी वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
निर्मल नगर पोलिसांनी गेल्या आठवड्यात वांद्रे  पूर्व येथून ४ हजार ६२८ स्टँप पेपरवर बनवलेले प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आले होते. ही प्रतिज्ञापत्रे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी शाखाप्रमुख, गट प्रमुख यांच्या नावाने तयार करण्यात येत होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ विश्वास असून त्यांना बिनशर्त पाठींबा असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र हे प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या नावाने हे प्रतिज्ञापत्र देऊन त्याच्यावर नोटरी करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून गुन्हे शाखेने या तपासासाठी वेगवेगळी ४ पथके तयार केली आहेत. प्रतिज्ञापत्रावर असलेल्या नावाच्या व्यक्तींना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. तसेच हे प्रतिज्ञापत्र ज्या जिल्ह्यातील पदाधिका-यांचे आहे, त्याच्याकडे चौकशी करुन  जबाब नोंदविण्यात येत आहेत. यासाठी गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूर, नाशिक, पालघर या जिल्ह्याकडे चौकशीसाठी रवाना झालेली आहे.

प्रतिज्ञापत्रात ज्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदवले जातील, त्यांनी आपल्या जबाबात हे प्रतिज्ञापत्र मी दिले नाही किंवा त्याच्यावर माझी स्वाक्षरी नाही असे म्हटले तर शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतील अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.  हे पत्र तयार करणारे तसेच, पत्र तयार करायला सांगणारे याप्रकरणात दोषी असतील. त्यांच्यावर फसवणूक, बनावट दास्ताऐवज तयार केल्याप्रकरणी आणि शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी अटक होऊ शकते असे या अधिका-यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.