गुरुंचे निधन झाल्याचे कळूनही निखिल लढला हिंमतीने, बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले

145

महाराष्ट्राच्या बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल २८ वर्षांनंतर महाराष्ट्राला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. महाराष्ट्राचा बॉक्सर निखिल दुबे याने अंतिम फेरीत विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र अंतिम लढत जिंकताना निखिलला फार मोठ्या दुःखद घटनेला सामोरे जावे लागले. अंतिम लढत होण्याच्या काही तासांपूर्वी निखिलचे प्रशिक्षक धनंजय तिवारी हे त्याची लढत पाहण्यासाठी येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. हे ऐकल्यावर पूर्णपणे खचलेला निखिल आपल्या गुरूंना खरी श्रद्धांजली देण्यासाठी हिंमतीने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला आणि त्याने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करत महाराष्ट्राला १९९४ नंतर बाॅक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून देत गुरूंना खरी श्रद्धांजली वाहिली. निखिलच्या धैर्याचे सर्वत्र तोंड भरून कौतुक होत आहे.

Untitled
उपांत्य फेरीच्या लढतीतील छायाचित्र (निळ्या जर्सीत निखिल दुबे)

निखिलच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक 

निखिलमधील या खेळाडूवृत्तीचे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनीही विशेष कौतुक केले. रणजित सावरकर काही महिन्यापूर्वीच असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राला बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाले आहे. निखिल दुबे सारख्या बॉक्सरची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. निखिलने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ७१ ते ७५ किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. नऊ मिनिटांच्या लढतीत त्याने आपल्या खचलेल्या मनाला धीर देत प्रतिस्पर्ध्याचे आव्हान परतवून लावले. त्यानंतर त्याने अंतिम फेरीतही विजय मिळवून इतिहास रचला. कारण त्याची लढत बघण्यासाठी दुचाकीने मुंबईहून अहमदाबादला निघालेले प्रशिक्षक धनंजय तिवारी यांचे मंगळवारी अपघाती निधन झाले. ही बातमी त्याला लढतीच्या काही तासांआधी समजली होती, हे समजताच त्याच्या हातापायातील बळच गेले होते. पण या स्पर्धेतील पदक दिवंगत प्रशिक्षकांना खरी श्रद्धांजली ठरेल, या विचाराने निखिल लढला आणि जिंकला.

निखिल दुबेच्या माध्यमातून महाराष्ट्राला १९९४ नंतर प्रथमच बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण दक मिळाले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने या स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी अकोला येथे नॅशनल पूर्व प्रशिक्षण कॅम्प लावले होते. यामध्ये राज्यातील सर्व भागांमधून खेळाडू आले होते. त्याठिकाणी खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पहिल्यांदाच हे खेळाडू विमानाने गेले आणि विमानाने परत येणार आहेत. या स्पर्धेत एका खेळाडूचा पाय तुटला, तर निखिल दुबेचे प्रशिक्षक धनंजय तिवारी यांचे स्पर्धा पाहण्यासाठी येताना अपघाती निधन झाले, या दोन गोष्टी आमच्यासाठी दुःखदायक ठरल्या.

– डॉ. राकेश तिवारी, सरचिटणीस, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन.

(हेही वाचा शिवसेना हिंदुत्वावादी नव्हे पुरोगामी!)

गुरूंच्या निधनाचे वृत्त कळल्यावर पदक मिळवून श्रद्धांजली देण्याचा निश्चय  

मुंबई उपनगरातील पोईसर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय निखिलने बाॅक्सिंगचे प्राथमिक धडे प्रशिक्षक तिवारी यांच्या धनंजय बाॅक्सिंग क्लबमध्येच गिरवले. ‘पहाटे पाच वाजता तिवारी सरांचा अपघात झाल्याचा पहिला फोन मला आला. ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर सकाळी आठच्या सुमारास मला त्यांचे अपघाती निधन झाल्याचे कळले. पायाखालची जमिनच सरकली. माझी लढत बघण्यासाठी सर दुचाकीवरून येत होते आणि असे घडले. ही बाब मनाला कायम बोचत राहिल. हातापायातील बळच गेले होते. लढत सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर स्वतः तिवारी सरांच्या पत्नीने फोन करून ‘तुला यश मिळावे म्हणून तिवारी येत होते, तेव्हा या स्पर्धेतील राष्ट्रीय पदक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल’, असे सांगितले. अशा स्थितीतही त्यांनी दिलेल्या प्रोत्सहानामुळे मला लढण्याचे बळ मिळाले असे निखिल याने सांगितले.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या नेतृत्वात झालेल्या बदलामुळे २८ वर्षांनी महाराष्ट्राला बॉक्सिंगमध्ये ही प्रगती पाहायला मिळाली आहे. यासोबत या स्पर्धेत रोनाल्ड जोसफनेही कांस्य पदक मिळवले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.