मालाडमधील मालाड हिल जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुघर्टनेत आर.सी.सी. भिंत दिनांक २ जुलै २०१९ मध्ये कोसळली आणि यामध्ये ३२ नागरिकांना प्राण गमावावे लागले होते, तर काही जण जखमी झाले होते. येथील जलाशयाच्या ठिकाणांहून येणारे पावसाचे पाणी भिंतीला अडून झालेल्या या दुघर्टनेनंतर महापालिकेने आता येथील पावसाळी पाण्याचा निचरा योग्यप्रकारे व्हावा म्हणून पावसाळी पाण्याकरता वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त केले असून आजवर आयआयटी किंवा व्हीजेटीआय यांची सल्लागार म्हणून नेमणूक होत असली तरी महापालिकेने या कामांसाठी सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या सल्लागारांकडून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – ऋतुजा लटकेंचा राजीनाम्याबाबत BMC आयुक्तांची प्रतिक्रिया; म्हणाले, “येत्या 30 दिवसात…”)
मालाडमधील आंबेडकर नगर, पिंपरी पाडा येथे मालाड हिल जलाशयाची आर.सी.सी. संरक्षक भिंत २ जुलै २०१९ मध्ये कोसळली आणि यामध्ये ३२ नागरिकांना प्राण गमावावे लागले होते, तर काही जण जखमी झाले होते. जलाशयाच्या उतारावर येणारे पावसाचे पाणी संरक्षक भिंतीच्या जवळ येऊन अडले आणि संरक्षक खचून झोपड्यांवर कोसळली. त्यामुळे या संरक्षक भिंतीखाली दबले गेल्याने तेथील झोपडपट्टयांमधील रहिवाशांना जीव गमावावे लागले. त्यामुळे अडीच वर्षांनंतर महापालिकेने याठिकाणच्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीकोनातून मालाड टेकडी जलाशय ते कुरारपर्यंत पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या कामांसाठी महापालिकेने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या संस्थेला महापालिका सल्लागार शुल्क म्हणून १७ लाख ६० हजार रुपये देणार आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे विशेष प्रकारचे असल्याने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांची निवड केली आहे.
पावसाच्या पाण्याच योग्यप्रकारे निचरा न झाल्याने येथील संरक्षक भिंत कोसळली होती. या दुघर्टनेनंतर येथील महापालिकेच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. परंतु त्यानंतर प्रशासनाने येथील १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले होते. परंतु त्यापैंकी ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले आणि उर्वरीत ७३ झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे काम आजही होऊ शकलेले नाही. मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरामध्ये डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्यासोबत कचरा व माती गेल्यामुळे भांडी-कुंडी, कपडे, कागदपत्रे सारे काही वाहून गेले होते. वारंवारच्या मुसळधार पावसामुळे लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांचा जिवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने भाजपाच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. त्यामुळे मालाड जलाशय ते कुरारपर्यंतच्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यासाठी या आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community