लटकेंची उमेदवारी लटकल्यास ठाकरे गटातील या दोन माजी नगरसेवकांपैंकी एकाला लागणार लॉटरी

146

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनाम्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय महापालिकेने न घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून शिवसेना अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू शकते. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद सावंत आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही संभाव्य उमेदवारांमध्ये चढाओढ सुरु असून निष्ठावान प्रमोद सावंत आणि बाहेरुन आलेल्या कमलेश राय यांच्यातील संघर्ष आता पहायला मिळणार आहे.

( हेही वाचा : …तर ऋतुजा लटके महापालिका सेवेत पुन्हा परतण्याची करू शकतात इच्छा)

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीत ऋतुजा लटके यांची उमेदवारीचे भवितव्य अधांतरी असल्याने या मतदार संघात शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आहे. माजी नगरसेवक प्रमोद सावंत आणि माजी नगरसेवक कमलेश राव हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असून सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोघांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने प्रियंका सावंत आणि सुषमा राय या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु २०१९च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे कमलेश राय यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कमलेश राय हे माजी खासदार संजय निरुपम यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. परंतु काँग्रेसमध्ये निरुपम यांचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर राय यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

तर माजी नगरसेवक प्रमोद सावंत हे ठाकरे गटाचे अंधेरी विधानसभा संघटक असल्याने त्यांनीही लटके यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छा प्रकट केल्याचे ऐकायला मिळत आहे. लटके यांचे राजकीय भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याने न्यायालयातही लटके यांना दिलासा न मिळाल्यास शिवसेनेला पर्यायी उमेदवार देण्याची गरज भासणार आहे. तसे झाल्यास सावंत आणि राय या दोन्ही नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आपली नावे पुढे रेटण्यास सुरुवात केली असून यामुळे याठिकाणी गटबाजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.