अंधेरी पूर्व विधानसभेवरील भाजपची पकड अधिक मजबूत

165

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपला ऋतुजा लटके आणि भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली. यातील लटके यांचा महापालिका सेवेचा राजीनामा प्रशासकीय अडचणींमध्ये अडकला असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत मोठा तिढा शिवसेनेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी धनुष्यबाण गमावलेल्या शिवसेनेवर आता उमेदवार गमावण्याची वेळ आल्यास शिवसेना उध्दव गटाचे आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे आव्हानच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे गणेशोत्सवासह नवरात्रोत्सवातही मतदारांपर्यंत पोहोचून अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करणाऱ्या भाजपचे पारडे प्रथमदर्शनी तरी जड असल्याचे पहायला मिळत शिवसेनेच्या ठाकरे गटाला याठिकाणी करो या मरोच्या भूमिकेत लढा द्यावा लागणार आहे.

( हेही वाचा : मालाड संरक्षक भिंत दुर्घटना : पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी कुरारपर्यंत टाकणार पर्जन्य जलवाहिनी)

अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपचे उमेदवार असलेले रमेश लटके हे ६२,७७३ मते मिळवून विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष असलेले उमेदवार मुरजी पटेल यांना ४५,८०८ एवढी मते मिळाली होती. परंतु लटके यांच्या निधनानंतर याठिकाणी घोषित झालेल्या पोटनिवडणुकीत लटके यांच्या पत्नी ऋतुजा आणि भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली. या विधानसभेत शिवसेनेचे सदानंद परब आणि प्रियंका सावंत हे दोन नगरसेवक आहेत. तर काँग्रेसच्या सुषमा राय आणि भाजपचे मुरजी पटेल, केशरबेन पटेल, सुनील यादव, पंकज यादव आणि अभिजित सामंत असे नगरसेवक २०१७च्या निवडणुकीत निवडून आले होते. यातील भाजपचे केशरबेन पटेल आणि मुरजी पटेल यांचे जातप्रमाणपत अवैध ठरल्याने त्या जागी अनुक्रमे शिवसेनेचे नितीन सलाग्रे आणि संदीप नाईक या दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची नगरसेवक म्हणून निवड झाली. तर सुषमा राय यांचे पती कमलेश राय यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्याने रायही शिवसेनेत सहभागी झाल्या. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवक संख्येत वाढ होऊन त्यांची संख्या चार एवढी झाली आहे, तर भाजपची संख्या तीन एवढी आहे. त्यातील भाजपचे अभिजित सामंत आणि पंकज यादव यांचे काही मतदान केंद्रच या अंधेरी पूर्व विधानसभेत येत आहे.

मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाले असले तरी या दोन्ही प्रभागातील मतदारांवर पटेल यांचा प्रभाव आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे संदीप नाईक आणि काँग्रेसचे नितीन सलाग्रे यांची नगरसेवक म्हणून निवड झाली असली तरी दोन्ही नगरसेवकांचा प्रभागात तेवढा प्रभाव नाही. सन २०१७च्या निवडणुकीत केशरबेन पटेल यांना जिथे १२,०६४ मते मिळाली होती, तिथे दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे नितीन सलाग्रे यांना केवळ ३,७१७ मते मिळाली होती, तर मुरजी पटेल यांना जिथे १०,८६७ मते मिळाली होती, तिथे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांना ७,३१३ मते मिळवता आली होती.

त्यामुळे नगरसेवकांच्या प्रभागानुसार शिवसेनेची बाजू मजबूत दिसत असली तरी शिवसेनेचा धनुष्यबाण नसल्याने याचा परिणाम मतदानावर होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या परंपरागत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेल्याने मशाल हे चिन्ह या निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाला मिळाले आहे. मात्र, येथील मतदारांची टक्केवारी विचारात घेता मराठी भाषिकांसह पारशी, पंजाबी, उत्तर भारतीय,बिहारी अशाप्रकारे हिंदु मतदार संघ आणि मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी मतदारही आहे. सन २००९मध्ये अंधेरी पूर्व हे विधानसभा क्षेत्र निर्माण झाल्यानंतर याठिकाणी काँग्रेसचे सुरेश शेट्टी हे निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे रमेश लटके यांचा ५ हजार मतांनी पराभव झाला होता. तर सन २०१४मध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतरही रमेश लटके हे साडेचार हजार मताधिक्यांनी प्रथम निवडून आले होते. भाजपला केवळ १३ दिवसांचा अवधी मिळाल्यानंतरही भाजपचे उमेदवार सुनील यादव यांना ४७, ३३८ मतदान झाले होते, तर शिवसेनेचे विजयी उमेदवार असलेल्या लटके यांना ५२, ८१५ मतदान झाले होते.

तर २०१९च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची पुन्हा युती झाल्यानंतर युतीचे उमेदवार रमेश लटके यांना ६२ हजार मते मिळाली होती. म्हणजे युतीमध्येही लटके यांना केवळ शिवसेनेच्या परंपरागत ५० हजार मतांपेक्षा १० ते १२ हजार अधिक मिळवता आली होती.

त्यामुळे शिवसेनेची मुळ मते ही ५०हजार असून आघाडीतील काँग्रेसची २७ हजार मते मिळाल्यास त्यांना ७० हजारांचा पल्ला गाठता येवू शकतो. परंतु भाजपने सन २०१४मध्ये प्रथम स्वबळावर ही निवडणूक लढवली होती, त्यावेळी भाजपचे सुनील यादव यांना ४७, ३३८ मतदान झाले होते. त्यामुळे भाजपचे मूळ मतदार हे ४७ हजार एवढे आहेत. त्यावेळी मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल हे काँग्रेसमध्ये होते. परंतु या दोन्ही माजी नगरसेवकांची भर पडल्याने सुमारे १२ हजार मतांची वाढ ही भाजपच्या मतदानात होत असल्याने भाजपच्या मूळ मतांची आकडेवारी ही ७० हजारांच्या आसपास आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या विधानसभेत बरोबरीत असून अपक्ष म्हणून मुरजी पटेल यांनी मिळवलेली ४५ हजार मतांचा विचार करता भाजपला या मतदानाचा टक्का वाढवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह नसल्याने मुरजी पटेल यांनी अर्धी लढाई जिंकलेलीच आहे,त्यातच त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराचे भवितव्य न्यायालयाच्या निकालावर असल्याने ऋतुजा लटके यांना उमेदवारी न दिल्यास मुरजी पटेल यांच्यासमोरील आव्हान संपुष्टात येवून विजयाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यातच उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने मुरजी पटेल यांनी विभागातील प्रत्येक जनतेपर्यंत जावून आपली चेहरापट्टी करत अप्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवातही केली. त्यातच मागील वेळेस ते उमेदवार असल्याने शिवसेनेला ऋतुला लटके किंवा ते नसल्यास अन्य उमेदवाराचा प्रचार आणि त्यांचे नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भाजपची सर्व बाजूंनी या मतदार संघावरील पकड मजबूत असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.