गोंदिया जिल्ह्यातील हत्तींच्या कळपाने बुधवारी रात्री नागणडोह गावात शिरून संपूर्ण गावातील घरांचे नुकसान झाले. सुदैवाने गावात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच हत्तींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. नागणडोह हे गाव संपूर्ण जंगलात वसलेले असताना भयभीत गावक-यांनी रात्रीच गाव सोडून पोबारा केला.
गोंदियात बांबू हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरिस गोंदियात आलेले हत्ती बांबूच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते. परिणामी, शेताजवळ हत्ती दिसले की फटाके लावून त्यांना पळवण्यामागे गावकरी मग्न होते. आठवड्याभरापूर्वी हत्तींच्या कळपाचा पाठलाग करणा-या एका गावक-यालाही हत्तीने सोंडेने आपटून ठार केल्यानंतर गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारीच हत्तींचा कळप नागडोह गावाजवळ आला होता. शेतातील पीक खाण्यासाठी हत्तींचा कळप गावी दाखल झाल्याचे समजताच गावकरी रात्रभर जागेच राहिले. रात्री बाराच्या सुमारास हत्तींचा कळप थेट गावातच घुसला.
(हेही वाचा – विदर्भातील १३ लोकांचा बळी घेणारा हल्लेखोर वाघ सीटी १ अखेर जेरबंद)
सुदैवाने गावकरी जागे असल्याने त्यांनी लगेचच गाव सोडले. तब्बल ४० ते ४५ लोकांचा समूह नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील तिरखुरी गावात हातात मिळेल ते घरातील सामान घेऊन पोहोचला. या घटनेबाबत गावकरी तिरखुरी गावात पोहोचल्यानंतर गावक-यांना माहिती मिळाली. मात्र रात्रीच्या अंधारात गावात शिरणे जिकरीचे असल्याने सकाळी साडेसहाच्या सुमारास टेहाळणी पथकाने नागडोह गावातील आर्थिक नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत हत्तींचा कळप निघून गेला होता. सकाळी पुन्हा हत्तींचा कळप नागडोह गावात काही तासांसाठी परतला.
हत्तींचा कळप नागडोह येथे किमान पाच ते सहा दिवस राहील, असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोरटोला गावात गावक-यांची राहण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती नवेगाव बांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी दिली. या गावातच गावक-यांच्या राहण्याची आणि जेवणाची वनविभागाने व्यवस्था केली आहे. हत्तींच्या बदलत्या स्वभाबाबत वन्यजीप्रेमींनी लोकांना हत्तींना त्रास न देण्याचे आवाहन केले आहे. हत्ती आक्रमक नाही आहेत. ओडिशा राज्यातून गडचिरोली आणि गोंदियात हत्तींचा कळप आता स्थिरावू पाहतोय. हा प्रदेश हत्तींकरिता नवीन आहे. छत्तीगसड आणि मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे हत्तींच्या अधिवास टिकवण्यासाठी वनविभागाने कायमस्वरुपी योजना कराव्यात, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.