कथित सोशल मीडियातज्ज्ञाने डाॅक्टरची तब्बल साडेचार कोटींची केली फसवणूक; गुन्हा दाखल

152

सोशल मीडियावर युवकांना कमाईचा मंत्र देणारा कथित सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे याने नागपूर, बडकस येथील एका होमिओपॅथी डाॅक्टरला तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात विविध संस्थांचे काम सांभाळणा-या अजित पारसे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बडकस चौकात डाॅक्टर राजेश मुरकुटे यांचे होमिओपॅथी क्लिनिक आहे. 2019 साली हेमंत जांभेकर यांच्या माध्यमातून मुरकुटे यांची पारसेशी ओळख झाली. डाॅक्टर मुरकुटे यांना नवीन होमिओपॅथी काॅलेज सुरु करायचे होते. त्यासंदर्भात त्यांनी पारसेसोबत चर्चा केली. महाविद्यायल सुरु करण्यासाठी ट्रस्टची स्थापना करावी लागेल असे पारसेने त्यांना सांगितले. त्यानंतर यश ग्लोबल ट्रेडलिंक नावाची कंपनी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्या कंपनीला सीएआरचा निधी मिळवून देतो असा दावा पारसेने केला आणि डाॅक्टर मुरकुटे यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर त्याने पीएमओच्या एका तथाकथित अधिका-याशी व्हाॅट्सअॅपच्या संवादाचे स्क्रीनशाॅट्स मुरकुटे यांना पाठवले. 21 जुलै 2020 रोजी मुरकुटे यांनी 25 लाख रुपये दिले. त्यानंतर वेळोवेळी पारसने त्यांच्याकडे विविध कामांसाठी पैसे मागितले. त्यानंतर अनेक कारणांवरुन त्याने मुरकुटे यांच्याकडून पैसे उकळले आणि तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातला. सध्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला कारवाईचे निर्देश दिले आहेत. उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्त्वात पथकाने गुन्हा नोंदवला आहे.

( हेही वाचा: “MSRTC ला दिलेली मदत अपुरी, राज्य सरकारचा ठिगळे लावण्याचा प्रकार” )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.