अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सुरू करण्याची मागणी; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

185

भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सुरू करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली आहे. सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

( हेही वाचा : IRCTC मध्ये १० वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! येथे करा अर्ज)

गेली ३८ वर्षे या सभागृहावर पडदा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक प्रखर आवाज, वंचित बहुजनांच्या वेदनेला आपल्या साहित्य, पोवाडे, लावण्यांमधून जागतिक पातळीवर पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या स्मृतींमधून आजही आपणाला प्रेरणा मिळते. परंतु गेल्या तब्बल ३८ वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या भायखळा, मुंबई येथील नाट्यगृह मात्र बंद पडले आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय. ही मोठी शोकांतिका आहे, असे पडळकरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

अण्णाभाऊंच्या नावाने हे नाट्यगृह सुरु करण्यात आले होतं. मात्र गेली ३८ वर्षे या सभागृहावर पडदा पडला आहे. १९६३ पासून लावणी, भारुड इत्यादी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात होता. ४५० प्रेक्षकांसाठी हे खुलं नाट्यगृह महापालिकेने सुरु केले होते. मात्र १९८४ ला हे नाट्यगृह बंद करण्यात आले. २००३ पर्यंत पडीक असणाऱ्या सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आला. त्यावेळी १३ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र तत्कालीन आघाडी सरकारने निधी देण्यास नकार दिल्यामुळे हे सभागृहाचे काम रखडले होते, असा आरोप करत पडळकरांनी केला आहे.

New Project 26

२०१४ ला माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षम युती सरकारने प्रस्ताव तयार केला. त्यानंतर ७५० आसन क्षमतेचं सभागृह उभं राहिलं. २०२१ पासून १७ महिने उलटले तरी हे सभागृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. नाट्यगृह सुरू करणे हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्य साधनेचा गौरव असेल असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.