देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह जवळच्या प्रदेशातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ या विशेष परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात येत आहे. लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि कन्स्ट्रक्शन टाईम्सच्या सहकार्याने मुंबईच्या फोर सिझन हॉटेल येथे शनिवार, 15 ऑक्टोबर रोजी ही एकदिवसीय परिषद पार पडणार आहे. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून समारोपाच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितांना संबोधित करतील. यावेळी पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहे. तसेच परिषदेनंतर पायाभूत सुविधा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मानही मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : दिवंगत नगरसेवक सुनील यादव यांचे नाव उद्यानाला देण्यास शिवसेनेची आडकाठी)
खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून परिषदेचे आयोजन
मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव असलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष परिषदेत रस्ते विषयक नवीन तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी मुक्त मुंबई – धारावी पुनर्विकास, शहरी दळणवळण, अतिवृष्टीमुळे साचणारे पाणी, रियल इस्टेट क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजना याविषयी चर्चा केली जाणार आहे.तसेच स्टॅक (STAC) समितीच्या वतीनेही विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या परिषदेला, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एम एम आर डी ए ), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एम आय डी सी), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एस आर ए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम एस आर डी सी) अशा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या शासकीय प्राधिकरणांचे सहकार्य लाभले असून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळी इथे आपले विचार मांडणार आहेत.
Join Our WhatsApp Communityमुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 या परिषदेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासमोरील आव्हाने आणि यावर मात करण्यासाठी नेमक्या उपाययोजना याविषयीची विस्तृत चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. या परिषदेत तज्ज्ञ मंडळींनी सुचविलेल्या उपाययोजना आणि त्यांनी मांडलेली मते यांची एक श्वेतपत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात येईल. तसेच या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल.
– खासदार राहुल रमेश शेवाळे