१३ माणसांचा बळी घेणाऱ्या वाघाला पकडले; वाचा… त्या २४ तासांचे थरारक वर्णन!

240

गडचिरोलीत गेल्या पंधरावर्षांपूर्वी एकही वाघ नव्हता. दहा वर्षांपूर्वी तर एखाद-दुसरा वाघ गडचिरोलीत दिसायचा, हळूहळू वडसा, आरमोरी तसेच ब्रह्मपुरी येथे वाघांचा वावर वाढला. मानवी वस्तीजवळच जन्मलेल्या सिटी १ या वाघाला ठार मारण्याच्या मागणीला १२ तास उलटत नाहीत, तोच वाघाला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या वाघाला शोधण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव पथकाने जंगलातील प्रत्येक नागमोडी वळणे पालथी घातली. अखेरच्या २४ तासांचा थरार हा केवळ सिटी१ च्या स्वभावाची वैशिष्ट्ये ध्यानात घेऊन रचलेल्या व्यूहरचनेचा होता. अखेर गुरुवारी सकाळी सिटी१ बचाव पथकाच्या जाळ्यात अडकला आणि त्याची थेट रवानगी नागपूरातील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात झाली.

( हेही वाचा : पंजाब गुप्तचर विभागावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला मुंबईतून अटक; एटीएसची मोठी कारवाई)

सिटी१ वाघाला ठार मारण्याची मागणी होत असतानाच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम त्याला जिवंत पकडण्याच्या मुद्द्यावर ठाम होती. या टीमचे नेतृत्व डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केले. सिटी१ या वाघाचा स्वभाव वेगळा आहे, हे मुळात त्याच्या मानवी वस्तीजवळील शेतीतल्या वावरातूनच दिसून आले होते. चिमूरमध्येच शेतात वाघाचा वावर वाढला आणि त्याला जेरबंद करण्याचा निर्णय झाला. ही गोष्ट आहे डिसेंबर २०२१ सालाची… चिमूरमध्ये वाघाने माणसाचा बळी घेतला अन् सिटी१ म्हणजेच चिमूर टायगर१ला पकडण्याचा निर्णय झाला. हा वाघ कुठे जन्मला याबाबत निश्चित सांगता येत नाही, असे डॉ. खोब्रागडे सांगतात. माणसाचा वावर वाढताच त्याने लगेचच चिमूर सोडले. तो हळूहळू वेगवेगळ्या प्रदेशात जाऊ लागला. सिटी१ला त्याच्या हक्काची जागा खुणावत होती. परंतु सिटी१ला स्थानिक मक्तेदारी निभावणा-या वाघाशी युद्ध करुन प्रदेश बळकावता येत नव्हता. फेब्रुवारी महिन्यात भंडा-यातील लाखानदूर येथील जंगलात सिटी१ने माणसाचा बळी घेतल्यानंतर वाघाला पकडण्यासाठी अखेरिस ताडोबाच्या वन्यप्राणी पथकाला नेमण्यात आले. त्याचवेळी चंद्रपूरातील वाघ आणि बिबट्याने मानवी वस्तीजवळ जात माणसांचा बळी घेतला.  टीमला चंद्रपूरात जावे लागले. मधल्या काळात इतर वन्यप्राणी बचाव पथकाच्या टीम सुद्धा सिटी१च्या मागावर होत्या. परंतु सिटी१ सर्वांनाच चकवा देत होता.

New Project 6 3
सिटी 1 ला पकडणारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम

सिटी१ने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीतील वडसा, गोंदियात वर्षभराच्या काळात वास्तव्य केले. या काळात त्याने सर्वात जास्त बळी वडसा येथे जंगलात गेलेल्या माणसांचा घेतला. १३ माणसांपैकी ६ बळी केवळ वडसातच गेले. जून महिन्यानंतर भर पावसात सिटी१ला जंगल भागांत शोधणे आव्हानात्मक होऊ लागले. दरम्यानच्या काळात दुस-यांदा ताडोबाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम सिटी१च्या शोधमोहिमेत सहभागी झाली. परंतु विदर्भातील इतर भागांतील वाढत्या संघर्षमय परिस्थितीमुळे टीम पुन्हा इतर ठिकाणी नियुक्त झाली. गणपतीमध्ये वडसा येथे सकाळी जंगलात एका माणसाचा सिटी१ने बळी घेतला. त्यानंतर थर्मल ड्रोनसह सिटीसाठी गडचिरोलीतील प्रत्येक जंगलाचा कोपरा रात्रंदिवस वनाधिकारी तपासत होते. परंतु सिटी१ झाडीझुडूपात लपण्यात यशस्वी होत होता.

सप्टेंबर महिन्यात ताडोबाच्या टीमने पूर्णवेळ सिटी१च्या शोधाकडे लक्ष वळवले. त्याचा स्वभाव वैशिष्ट्यांचा अगोदर अभ्यास केला. सिटी १ रात्री वीजेसमोर येत नव्हता, या निरीक्षणाबाबत सर्वांचे एकमत होते, असे डॉ. खोब्रागडे म्हणतात. त्याच्या शिकारीपासून, रात्री जंगलातील वावर या सर्वांचा अगोदर आम्ही अभ्यास केला. असे त्यांनी सांगितले.

बंकरची शक्कल कामी आली…

दस-याच्यावेळी टीमने बंकर बनवून घेतला. बंकरमध्ये बसून सिटी१ला ठराविक ठिकाणाहून बंदूकीच्या माध्यमातून बेशुद्ध करण्याची योजना टीमने आखल्याचा निर्णय झाला. मात्र काही दिवसानंतर वडसामधून सिटी१ पुन्हा गायब झाला. गुरुवारपासून तो दिसत नसल्याचे कॅमेरा ट्रॅपमधून आम्हांला समजले, अशी माहिती डॉ. खोब्रागडे यांनी दिली.

शेवटचे दोन दिवस

सोमवारी आरमोरीतील माणसाच्या बळीत सिटी१चा सहभाग असल्याचे समोर आले. १२ तारखेच्या पहाटे सिटी१ने नजीकच्या वडमासा येथे सकाळी तीन वाजता गायीला मारले. गायीला मारल्यानंतर सिटी१ निघून गेला. आम्ही सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत त्याची वाट पाहिली. त्याचवेळी दुस-या ठिकाणी आम्ही बंकर लावून गायीचे वासरु ठेवले होते. गायीच्या वासराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कॅमे-यातून सर्व हालचाली आम्ही मोबाईलवर पाहत होतो. सिटी१ने वासरु मारल्याचे आम्ही पाहिले. आम्ही पोहोचेपर्यंत सिटी तिथूनही गायब झाला. अखेर आम्ही १२ ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेसहापासून बंकरमध्ये लपून बसलो.  गुरुवारी सकाळी चारच्या सुमारास सिटी१ पुन्हा मेलेले वासरु खायला आला. त्याचवेळी सिटी१वर अचूक नेम लागला आणि सिटी१ ला बेशुद्धीचे इंजेक्शन लागले. सिटी१ वीस मीटर पुढे चालत गेला आणि बेशुद्ध झाला, अशी माहिती डॉ. खोब्रागडे यांनी दिली.  त्याची रवानगी १५० किलोमीटर लांब नागपूर येथील गोरेवाडा येथे केली आणि मोहिम यशस्वीरित्या फत्ते केल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. या शोधमोहिमेत डॉ. खोब्रागडे यांच्यासह पोलिस नाईक ए. सी. मराठे, बी. दांडेकर, ए. मोहुर्ले, एस. नन्नावरे, ए. डी. तिखट, ए. डी. कोरपे, ए. दांडेकर यांनी सहभाग नोंदवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.