पंजाब गुप्तचर विभागावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला मुंबईतून अटक; एटीएसची मोठी कारवाई

196

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभाग कार्यालयावर रॉकेट हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राज्य एटीएसने या अतिरेक्याला पश्चिम उपनगरातील मालाड येथून अटक केली असून त्याचा ताबा पंजाब पोलिसांकडे देण्यात आला आहे.

चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग कारीसिंग उर्फ करज सिंग (३०) असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे नाव आहे. चरतसिंग हा अतिरेकी कॅनडा स्थित लकबीरसिंग लांडा या अतिरेक्याच्या संपर्कांत होता अशी माहिती एटीएसने दिली आहे. चरतसिंग याच्यावर पंजाब मध्ये ८ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असून एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती व तो पंजाबमधील कपुर्थळा तुरुंगात शिक्षा भोगत होता. मार्च महिन्यात तो दोन महिन्याच्या संचित रजेवर बाहेर आला होता, त्यानंतर तो अतिरेक्याच्या संपर्कात आला. अतिरेक्यांनी ९ मे २०२२ रोजी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर केलेल्या रॉकेट हल्ल्यात चरतसिंग याचा सहभाग होता. संचित रजेवर आल्यानंतर त्याने पंजाबमध्ये हे अतिरेकी कृत्य केले होते, त्यानंतर तो फरार होऊन मुंबईत येऊन लपला होता.

चरतसिंग याचा पंजाब पोलीस कसून शोध घेत असताना चरतसिंग हा मुंबईत लपून बसला असल्याची गोपनीय माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. दरम्यान एटीएसने मालाड परिसरात चरतसिंग कुठे लपून बसला आहे याची माहिती मिळवून छापा टाकला. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. चरतसिंग याला अटक करून पंजाब पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.