मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १३ मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत. परंतु, विविध कारणांमुळे झालेल्या विलंबचा मोठा फटका या प्रकल्पांना बसला असून, सर्वच प्रकल्पांच्या मूळ खर्चात जवळपास दोन हजार कोटींहून अधिक वाढ झाली आहे.
मुंबई व परिसरात ३३७.१ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. त्यापैकी काही मार्गांची कामे सुरू सुरू असून, काही प्रगतीपथावर आहेत. काही प्रकल्पांचा विस्तृत अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत केवळ मेट्रो १ मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. तर, मेट्रो २ अ आणि ७ या दोन मार्गांचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे.
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-१ हा मार्ग २०१४ साली सुरू झाला. या मार्गांची मूळ किंमत ४ हजार ६७३ कोटी अपेक्षित होती. मात्र प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा खर्चाचा आकडा ६ हजार ४१० कोटी रुपयांवर गेला. डी. एन. नगर ते मंडाळा मेट्रो २-ब मार्गाचा मूळ खर्च ८ हजार २६१ कोटी गृहीत धरण्यात आला आहे. मात्र विविध प्रकारचे कर, बांधकाम साहित्याची दरवाढ, बांधकामावरील व्याज लक्षात घेता, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हाच खर्च १० हजार ९८६ कोटी रुपयांवर जाईल. वडाळा-घाटकोपर-ठाणे- कासारवडवली मेट्रो-४ ची मूळ किंमत ११ हजार ११५ कोटी नमूद करण्यात आली आहे. मात्र प्रकल्प पूर्णत्वास जाईल तेव्हा ही रक्कम १४ हजार ५४९ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो-५ ची मूळ किमत ६ हजार ६२२ कोटी निश्चित केली आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हा आकडा ८४१६ कोटी रुपयांवर जाईल. कल्याण-तळोजा या मार्गाची मूळ किमत ४ हजार ७३८ कोटी आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हा खर्च ५ हजार ८६५ कोटीवर जाईल, असे नव्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कारणे काय?
मुळात या प्रकल्पांची घोषणा प्रत्यक्ष प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदा काढणे या प्रक्रिया सुरू करताना प्रकल्पाचा जो खर्च गृहीत धरला होता, त्यात प्रत्यक्षात विविध कारणांनी वाढ झाली आहे. काही प्रकल्पात मूळ खर्चात नंतर जमिनीच्या खर्चाची भर पडली. त्यामुळे अतिरिक्त बोजा पडला, अशी माहिती ‘एमएमआरडीए’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.