संभाजीनगरमध्ये १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारले जाणार आहे. बाळासाहेबांच्या या संग्रहालयात आनंद दिघेंच्या आठवणीही जतन करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
सिडको परिसरात उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु विविध कारणांमुळे झालेल्या विलंबामुळे स्मारकाच्या उद्घाटनास आणखी दीड वर्षांचा अवधी लागणार आहे.
स्मारकाचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. पहिल्या टप्प्याचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे. दुसऱ्या टप्याचे काम सुरू होणार आहे. स्मारकासोबतच बाळासाहेबांच्या पुतळ्याविषयी यापूर्वीच निर्णय झालेला आहे. स्मारकाच्या संग्रहालयात धर्मवीर आनंद दिघे व बाळासाहेबांची छायाचित्रे, आठवणीतील प्रसंगही समाविष्ट करावेत, अशी सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केल्याची माहिती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.
( हेही वाचा: लटकेंना किती मानसिक त्रास झाला हे त्यांनी मला स्वतः सांगितलं, राणेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप )
केवळ १० कोटी मिळाले
बाळासाहेबांच्या या स्मारकासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत केवळ १० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे. पण यापुढे कुठल्याही कामाला निधी कमी पडणार नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम निधीअभावी थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया भुमरे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community