पोस्टाने ग्राहकांसाठी खास सुविधा सुरू केली असून याचा प्रामुख्याने लहान बचत योजनेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना फायदा होणार आहे. या सुविधेच्या मदतीने पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्किम्सचे खातेदार कुठूनही त्यांच्या खात्याची माहिती मिळवू शकतात. यासाठी नेट बॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंग सेवेची गरज नाही कारण पोस्टाने सुरू केलेल्या नव्या सुविधेनुसार ग्राहकांसाठी खास ई-पासबुक फिचर लॉंच करण्यात आले आहे.
( हेही वाचा : Indian Post : आता पोस्टाद्वारे करता येणार ऑनलाईन खरेदी!)
ई पासबुकमुळे लहान बचत योजनेअंतर्गत कोणताही खातेदार काही मिनिटांत आपला बॅलन्स तपासू शकतो. पोस्ट विभागाने १२ ऑक्टोबरला या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. लोकांना चांगली सुविधा देण्यासाठी पोस्टाकडून ई-पासबुकचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणते खातेदार ई-पासबुकचा लाभ घेऊ शकतात?
पीपीएफ ग्राहक तसेच सुकन्या समृद्धी योजनेसारख्या लहान बचत योजनमध्ये गुंतवणूक केलेले कोणतेही ग्राहक आपल्या खात्याची संपूर्ण माहिती काही मिनिटांमध्ये तपासू शकतात. ई-पासबुक सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खात्याशी लिंक केलेला नोंदणीकृत क्रमांक असणे आवश्यक आहे. ई-पासबुकसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पोस्टाच्या ई-पासबुकद्वारे मिळणाऱ्या सुविधा
- या सुविधेच्या मदतीने तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता.
- ई-पासबुकद्वारे तुम्ही मिनी स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस बचत खाते आणि पीपीएफ योजनांसाठी मिनी स्टेटमेंट्स उपलब्ध असतील. मिनी स्टेटमेंटमध्ये ग्राहकांना शेवटच्या १० व्यवहारांची माहिती मिळेल.
पीपीएफ, बचत खाते, सुकन्या समृद्धी खात्यातील बॅलन्स ई-पासबुकद्वारे कसा तपासाल?
- सर्वात आधी तुम्हाला पोस्टाच्या indiapost.gov.in किंवा ippbonline.com यावर मोबाईल क्रमांक, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागेल.
- यानंतर तुम्ही ई-पासबुक हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला या योजनेचा प्रकार, खाते क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागेल.
- OTP टाकून व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, फुल स्टेटमेंट असे पर्याय निवडू शकता.
- ई-पासबुकचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.