तासाभराच्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट

133

मुंबईत सायंकाळी अचानक पावसाच्या सरींनी जोर धरला. या पावसामुळे परतीच्या प्रवासासाठी बाहेर असलेले मुंबईकर चांगलेच अडकले. अचानक पावसाच्या सरी जोरात सुरु झाल्याने आडोशाचा आधार घेण्यासाठी मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली. मुंबईतच नव्हे तर ठाणे, वाशी परिसरातही सायंकाळी तासभर कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. विजांच्या कडकडाटात परतीच्या पावसाची वातावरण मुंबईत दिसून येत असले तरीही प्रत्यक्षात डहाणूपर्यंत परतलेल्या नैऋत्य मोसमी वा-यांना सोमवारनंतरच माघारी परतायला मुहूर्त मिळेल.

विक्रोळीत सर्वाधिक पाऊस

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पहिल्या सरींपासूनच जोरदार धारा सुरु झाल्याने छत्रीची सवय मोडलेले मुंबईकर चांगलेच ओलेचिंब भिजले. काहींनी भिजतच प्रवास करणे पसंत केले. ब-याच ठिकाणी पाणी साचल्याचेही चित्र दिसत होते. पावसाच्या सरींचा जोर वाढतच राहिल्याने काही कालावधीनंतर रस्त्यावरील वाहतूक हळू सुरु होती. पावसामुळे सायन येथील बसवाहतूक काही काळासाठी दुस-या मार्गाने वळवण्यात आली होती. जोगेश्वरी, अंधेरी, मरोळ, विक्रोळी, विद्याविहार आणि भांडूप परिसरात पावसाचा मारा सतत सुरु होता. वडाळा चेंबूर, वांद्रे परिसरांतही सायंकाळी पावसाची हजेरी दिसून आली. सर्वात जास्त पाऊस विक्रोळीत झाला. विक्रोळीत ५४.१ मिमी पाऊस सुरु होता. सायंकाळी उशिराने पावसाला सुरुवात झाल्याने कमाल तापमानावर पावसाचा किंचितसाही परिणाम जाणवला नाही. सांताक्रूझ केंद्रात कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. वीकेण्डलाही ठाणे आणि मुंबईत सोसाट्याच्या वा-यासह मेघगर्जनेसह विजाच्या कडकडाटात परतीचा पाऊस पुन्हा हजेरी लावेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर महिन्यात चौदा दिवसांतच परतीच्या पावसाने दिडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद केली. सांताक्रूझ येथे १६७.१ तर कुलाब्यात १७८.८ मिमी पाऊस झाला. मुंबईत ऑक्टोबरचा पाऊसही सरासरीपेक्षाही दुप्पटीने जास्त झाला आहे.

(हेही वाचा जे जे रुग्णालयात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.