चार दिवसांत ६५ हजार जंत नाशक गोळ्यांचे वाटप; गोळ्या दर्जेदार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

171
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम अंतर्गत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत १० ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६५ हजार ९६३ इतक्या लाभार्थींना गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे व कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाही.  औषधी गोळ्या उत्कृष्ट दर्जाच्या असून समाज माध्यमावर याबाबत अफवा पसरल्या जात असल्या तरी नागरिकांनी  त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने दिनांक १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ या आठवड्याच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय व शाळा बाह्य मुला-मुलींना जंतनाशक औषधाची गोळी (Albendazole) चे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे ही या मोहीमेची उद्दिष्टे आहेत.
जंतनाशक मोहिमेदरम्यान वय १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य केंद्र अंतर्गत स्थानिक पातळीवर सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आशा, आरोग्य स्वयंसेविका यांच्या मार्फत जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहे. शालेय आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळेतील मुला-मुलींची तपासणी, उपचार, समुपदेशन व मार्गदर्शन देखील या कालावधीत करण्यात येत आहे.
शुक्रवारी १४ ऑक्टोबर २०२२ काही समाज माध्यमांमार्फत ध्वनिफित प्रसारित करुन आरोप करण्यात आले आहेत की, या अभियान अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या गोळ्यांचे वाटप होत आहे तसेच आशा व आरोग्य सेविकांना गोळ्या वाटप न करण्याबाबत सांगितले आहे. मात्र  ध्वनिफित ही अत्यंत चुकीची असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारचे आरोप करणारे कोणतीही माहिती किंवा ध्वनिफित अग्रेषित करु नये, असेही विनम्र आवाहन केले आहे. या औषधी गोळ्या उत्कृष्ट दर्जाच्या असून त्याबद्दल नागरिकांनी विश्वास बाळगावा, असे आवाहन  महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या अभियान अंतर्गत  १० ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६५ हजार ९६३ इतक्या लाभार्थीना ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे व कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाही. बालकांना कोणतेही लक्षणे आढळले तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी जंतनाशक मोहीम अंतर्गत सहभाग घेऊन बालकांचे, मुला-मुलींचे आरोग्य सदृढ ठेवायचे आहे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.