देशातील सर्वात मोठ्या खासगी वीज कंपनीवर सायबर हल्ला

223

देशाच्या उर्जा क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी असलेल्या टाटा पॉवरवर सायबर हल्ला झाला आहे. कंपनीच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर हा हल्ला झाला आहे. स्वतः कंपनीनेच ही माहिती दिली आहे. दरम्यान या सायबर हल्ल्याने फारसे नुकसान झालेले नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात कंपनीने सांगितले की, टाटा पॉवरतर्फे सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. सर्व महत्वाच्या सिस्टिम्स योग्यरितीने कार्यरत आहेत. टाटा पॉवर ही देशातील एक महत्वाची वीज पुरवठादार कंपनी आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टाटा पॉवरतर्फे वीज पुरवठा केला जातो. टाटा पॉवरचे मुख्यालय मुंबईत असून 10,577 मेगावॅट वीज निर्मितीची कंपनीची क्षमता आहे. ही देशातील सर्वात मोठी खासगी वीज कंपनी मानली जाते. कंपनीच्या पायाभूत यंत्रणेवरच हा हल्ला झाला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या एकूण सिस्टिमवर पडला आहे. टाटा पॉवर कंपनीने शेअर बाजारालाही देखील याबाबत कल्पना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी आणि ग्राहकांशी संबंधित असलेल्या टच पॉईंट आणि पोर्टलबाबत अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

( हेही वाचा:  दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका; ‘या’ कंपनीने केली दूध दरात 2 रुपयांची वाढ )

कंपनीने म्हटले आहे की, आमच्या सर्व सिस्टिम्स ठीक आहेत, या हल्ल्याचा फारसा काही परिणाम झालेला नाही. काही आयटी सिस्टिम्सवर परिणाम झाला आहे. या प्रकरणी कंपनी सतत अपडेट देत राहील. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलच्या माहितीनुसार, टाटा पॉवरसह इतर वीज कंपन्यांवर अशा हल्ल्याची पूर्वमाहिती मिळाली होती. संबंधित कंपन्यांना अलर्टही केले गेले होते. फायरवॉलचे ऑडिट केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.