अंधेरी पोटनिवडणूक: केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीचा आढावा

147
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल, प्रवीण कोया आणि  सत्यजित मंडल यांनी कामांचा आढावा घेतला.  उपनगराच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कार्यवाहीची माहिती मा. निवडणूक निरीक्षकांना दिली. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहींची माहिती या बैठकीदरम्यान निवडणूक निरीक्षकांना दिली. या बैठकीला केंद्रीय निवडणूक निरीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी सत्यजित मंडल तसेच उपजिल्हाधिकारी अजित साखरे आणि निवडणूक विषयक कार्यदायित्वे सोपविण्यात आलेले समन्वय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्यावतीने निवडणूक निरीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी ‘अंधेरी पूर्व’ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर माहिती मान्यवर निवडणूक निरीक्षकांना दिली. यामध्ये प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था, अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांच्या विषयीची संक्षिप्त माहिती, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबतची माहिती, प्रसिद्धी व प्रचार विषयक बाबी, निवडणूक कर्तव्य सोपवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणांचा तपशील आदी माहितीचा समावेश होता.
यात बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यदायित्वाची आणि करण्यात आलेल्या कामांची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. तसेच याबाबत निवडणूक निरीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनादेखील त्यांनी समाधानकारक उत्तरे देत माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत मतदान करण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती कार्यक्रमांची माहितीही निवडणूक निरीक्षकांनी आवर्जून घेतली व त्याबाबतदेखील समाधान व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.