आशिया चषक 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा कोरले ट्राॅफीवर नाव

197

महिला आशिया चषक 2022 मधील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाने भारतीय गोलंदाज रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाच्या भेदक मा-यासमोर गुडघे टेकले. श्रीलंकेने 20 षटकात 9 विकेट्स गमावून भारतासमोर 66 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 8.3 षटकातच आपल्या खिशात घातला.

( हेही वाचा: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आता T20 विश्वचषकाचा आनंद घ्या चित्रपटगृहात )

श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनासोबत सलामीला आलेली शेफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. त्यानंतर जेमिमाह राॅड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. मात्र, स्मृती मानधनाने दुस-या बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली. तिने या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद अर्धशतकीय खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 11 धावांची खेळी केली. भारताने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.