सध्या उद्धव गटाच्या शिवसेनेत एकच आवाज ऐकू येत आहे, तो म्हणजे शिवसेनेत ४ महिन्यांपूर्वी उद्धव गटात प्रवेश केलेल्या आणि थेट उपनेत्या बनलेल्या सुषमा अंधारे यांचाच. यामुळे कालपर्यंत अडचणीच्या वेळी उद्धव ठाकरे यांची बाजू हिरीरीने मांडणाऱ्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा आवाज गायब झाला आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरु आहे, राज्यभर ही यात्रा होणार आहे, मुंबईकडील यात्रेत पेडणेकर यांना बोलावण्यात आले नाही, त्यामुळे त्या नाराज आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही पेडणेकर नाराज असून, त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याचे म्हटले आहे.
नाराजीची चर्चा कशामुळे?
शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणूक लागली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. ढाल आणि तलवार हे चिन्ह दिले. दुसरीकडे ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आणि मशाल हे चिन्ह दिले. शिवसेनेतल्या बंडानंतर आक्रमक नेत्यांची पोकळी जाणवू लागली. त्यात नव्याने शिवबंधन घातलेल्या सुषमा अंधारे आणि जुने जाणते भास्कर जाधवांनी ही जागा भरून काढली. दसरा मेळाव्यातही या दोघांची भाषणे गाजली. महाप्रबोधन यात्रेतही त्यांच्याच भाषणांची चर्चा आहे. तर दुसरीकडे महाप्रबोधन यात्रेला किशोरी पेडणेकर यांना बोलावले नसल्याचे समजते. त्यामुळे त्या नाराज आहेत, असा दावा शालिनी ठाकरे यांनी केला.
(हेही वाचा तुम्ही राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे असाल, तर हलाल उत्पादने खरेदी करू नका – शरद पोंक्षेंचे आवाहन)
शालिनी काय म्हणाल्या?
शालिनी ठाकरे यांनी एक खोचक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे…महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करून उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना..अजब आहे. मात्र, शालिनी यांच्या ट्विटवर आणि या चर्चांवर अजून तरी पेडणेकर यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली नाही.
Join Our WhatsApp Community