बहुप्रतिक्षित धारावी पुनर्विकास प्रकल्प येत्या चार महिन्यांत प्रत्यक्ष सुरू केला जाणार असून, लवकरात लवकर तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एन. श्रीनिवास यांनी शनिवारी दिली.
‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन @ २०३४’ या परिषदेत ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने शनिवारी वरळी येथे या विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले.
श्रीनिवास म्हणाले, देशातील इमारत पुनर्निर्माण क्षेत्रात धारावी पुनर्विकास प्रकल्प ऐतिहासिक ठरणार आहे. कारण इथे लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. मुंबईतील जवळपास ४० टक्के झोपडपट्टी धारावीत आहे. त्यामुळे इथे पुनर्विकास करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. विमानतळानजीक असल्याने इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारे निधी उभारता येणार नाही. परिणामी संपूर्ण निधी खासगी-सार्वजनिक भागिदारी तत्वावर उपलब्ध करून द्यावा लागेल.
त्या व्यतिरिक्त पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने दुबार किंवा बोगस नावे शोधून काढण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. या सर्व आव्हानांवर मात करून येत्या तीन ते पाच महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लक्ष्य असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.
सातत्याने वाढणारी लोकसंख्या हे मुंबईपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज विविध राज्यांतून २०० नागरिक मुंबईत स्थलांतरित होतात. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतूनही मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होत आहेत. एकट्या धारावीचा विचार करता गेल्या काही वर्षांत इथली लोकसंख्या १ दशलक्ष इतकी झाली आहे. ही संख्या कोल्हापूर जिल्ह्याइतकी आहे. त्यामुळे शहरांतील वाढती लोकसंख्या ही झोपडपट्टी पुनर्वसनातील प्रमुख अडथळा असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community