चांदिवलीतील रुग्णालयाच्या बांधकामासाठी आयआयटीची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती

144

कुर्ला-चांदिवलीमध्ये महापालिकेच्यावतीने रुग्णालय आणि निवासी इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्यावतीने चांदिवली संघर्ष नगरमध्ये हे २५० खाटांचे रुग्णालय बनवले जात आहे. यासाठी महापालिकेने रुग्णालय आणि निवासी इमारतीचे आराखडे बनवण्यासाठी दत्ता आणि दत्ता असोशिएट्स या वास्तूशास्त्रज्ञांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून आता या बांधकामासाठी आयआयटी मुंबईची तज्ज्ञ समितीची नेमणूक केली आहे.

चांदिवलीतील झोपडपट्टी परिसरात आणि मोठ्या प्रमाणात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन झाले अशा चांदिवली संघर्ष नगरमध्ये तळ घर अधिक तळमजला अधिक १० मजले आणि निवासी सदनिका इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. या रुग्णालय आणि निवासी इमारतीच्या बांधकामासाठी प्रीफॅब्रीकेटेड स्ट्रक्टचरल स्टील पध्दतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. महापालिकेने आतापर्यंत अशा प्रकारच्या बांधकामाची पध्दत अवलंबली नसल्याने व विशिष्ट प्रकारचे बांधकाम असल्याने महापालिकेने पवई मुंबईतील आयआयटी या तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

या तज्ज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून प्रिफॅब्रीकेटेड स्ट्रक्चरल स्टील पध्दतीच्या बांधकामाची व्यवहार्यता पडताळणे आणि यासाठी नियुक्त केलेल्या वास्तूशास्त्रज्ञ सल्लागाराकडून तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक तसेच स्पेशिफिकेशन व पुरावा पडताळणी आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी आयआयटी मुंबईला १५ लाख रुपये एवढे शुल्क आगावू स्वरुपात दिले जाणार आहे.

( हेही वाचा: अंधेरी पूर्व पोटनिवडणूक: भाजप, शिवसेना ठाकरे गटाच्या समोर ९ अपक्षांचे आव्हान )

रुग्णालयाच्या उभारणीकरता आरोग्य तज्ज्ञ, एच.व्ही.ए.सी तज्ज्ञ, एम.ई तज्ज्ञ, मेडिकल गॅस तज्ज्ञ व इतर संबंधित तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे ज्या वास्तूशास्त्रीय तज्ज्ञांकडे सर्व तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून हे काम महापालिका करुन घेण्यासाठी सल्लागार संस्थांकडून मागवलेल्या स्वारस्य अर्जांमध्ये दत्ता अँड दत्ता असोशिएट्स-प्रविण नाईक अँड असोशिएट्स-हॉस्मेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या संयुक्त संस्थेला  ८९ गुण  प्राप्त झाले आहेत. त्या या संस्थेची सल्लागार म्हणून शिफारस करण्यात आली  आहे.

या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ३२२ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याने या सल्लागार कंपनीला एकूण बांधकाम किंमतीच्या १.८७ टक्के अर्थात एकूण सल्लागार शुल्क म्हणून  ६ कोटी २ लाख १४ हजार रुपये दिले जाणार आहेत. या सल्लागारांव्यतिरिक्त आता तज्ज्ञ सल्लागार म्हणून आयआयटी मुंबईची नेमणूक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.