अमरावती शहरांत गेल्या दीड महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याचा अखेर रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. रविवारी पहाटे चारच्या सुमारास वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यू पावला.
( हेही वाचा : World Green City : देशातली ‘या’ शहराला मिळाला वर्ल्ड ग्रीन सिटीचा बहुमान )
अमरावती शहरांत पहिल्यांदाच महिन्याभराहून अधिक काळ या बिबट्याचे दर्शन घडत होते. त्यामुळे हा बिबट्या चर्चेत आला होता. शहराला लागून असलेल्या पोहरामालखेड या राखीव जंगलातून बिबट्या, अमरावती शहरांत येत असल्याचे वनाधिका-यांच्या टेहाळणी पथकाच्या लक्षात आले. बिबट्या विभागीय आयुक्त आणि न्यायाधीशांच्या बंगल्यात रात्री वावरु लागल्याने चर्चांना उधाण आले. विदर्भ महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, पंजाबराव कृषी विद्यापीठातील विस्तीर्ण परिसरात बिबट्याचा रात्रीनंतर वावर सुरु व्हायचा. बिबट्या या परिसरातींल राष्ट्रीय महामार्ग ६ ओलांडून जात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. पहिल्यांदाच बिबट्याचा शहरात मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. टेहाळणी पथक आणि वन्यजीवप्रेमी लोकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करत होते. बिबट्याने कोणावरही हल्ला केला नव्हता. बिबट्यावर लक्ष ठेवण्यासठी शहरांत कॅमेरा ट्रेपही लावण्यात आले होते. मात्र बिबट्या कॅमेरा ट्रेपमध्ये दिसून येत नव्हता. रविवारी पहाटे मात्र राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन रस्ता ओलांडताना बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community