आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करीत शिंदे-फडणवीसांनी मतांची बेगमी केल्याची चर्चा आहे. नरेंद्र पाटील यांची सोमवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवाय त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही बहाल करण्यात आला.
( हेही वाचा : नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ )
राज्यातील आर्थिकदृष्ट्टया मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयं-रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
अलिकडेच झालेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटलांना महामंडळ देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार, सोमवारी १७ ऑक्टोबरला नियोजन विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश निर्गमित करीत नरेंद्र पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. शिवाय त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्र्यांना देय असलेल्या सर्व सोयी सवलती त्यांना लागू राहतील, असेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीने दिला होता डच्चू
राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नरेंद्र पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मराठा आरक्षणावरून परखड भूमिका घेतली होती. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अनेकदा टीका केली, त्यांना पदावरून हटविण्याचीही मागणी केली. या मागणीनंतर अवघ्या आठवडाभरात नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे पद रिक्त होते.
Join Our WhatsApp Community