अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीच्या उमेदवाराने जोरदार तयारी केली होती. तो जिंकून येण्याचा विश्वासही होता. परंतु, महाराष्ट्राची प्रथा-परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही उमेदवारी मागे घेतली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
( हेही वाचा : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; लटकेंसह ७ उमेदवारांमध्ये होणार लढत )
निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले
पराभवाच्या भीतीने भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, “अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन उमेदवार ऋतुजा लटके यांनी केले होते. रमेश लटके हा आमचा सहकारी आमदार होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे, आमदार प्रताप सरनाईक यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.
…अशी महाराष्ट्राची परंपरा
आपल्याकडे ज्या आमदाराचा मृत्यू होतो, त्याच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला की ती निवडणूक बिनविरोध करायची, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. भाजपा आणि शिवसेना युतीने या मतदारसंघात जो उमेदवार दिला होता, त्याने जोरदार तयारी केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वासही होता. परंतु, सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो. त्याआधी माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा केली. महाराष्ट्राची प्रथा-परंपरा कायम राखण्याचे काम भाजपाने केले आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community