बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवींद्र (17) या सिंहाचा सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्याला आर्थरायटीसचा आजार होता. आता उद्यानात वृद्धापकाळाकडे झुकलेल्या जेस्पा (11) हा एकमेव सिंह उरला आहे. उद्यानात उरलेला एकमेव सिंहदेखील वयोवृद्ध आहे, त्याचाही वृद्धापकाळामुळे मृत्यू ओढवल्यास सिंह सफारी पर्यटकांसाठी बंद करण्याची नामुष्की उद्यान प्रशासनावर येऊ शकते. गुजरातहून सिंहाची जोडी मिळण्यासाठी खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गुजरातहून सिंह लवकरात लवकर आणण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
( हेही वाचा : महापालिकेच्या तीन उपायुक्तांची खांदेपालट; बालमवार यांच्याकडे आता मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी )
रवींद्रला आर्थरायटीसचा आजार होता. गेली दोन वर्षे त्याला सफारीतील पिंजाऱ्यात सोडणे वनाधिकाऱ्यांनी बंद केले होते. त्यामुळे पर्यटकांना रवींद्रचे दर्शन मिळणे बंद झाले होते. उद्यानातील पिंजाऱ्यातच रवींद्र निपचित पडून होता. त्याला जागेवरून हलताही येत नव्हते. अखेरच्या दिवसांत रवींद्रच्या हालचालीही मंदावल्या होत्या. त्यामुळे रवींद्रचा वृद्धापकाळामुळे कधीही मृत्यू ओढवू शकतो, हे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. आजारी रवींद्रची दररोज शारीरिक तपासणी करण्यासाठी उद्यानात पूर्णवेळ आणि रहिवासी पशुवैद्यकीय अधिकारी नव्हते. दोन बिबट्याच्या बछड्यांच्या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार झाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात उद्यान प्रशासनाने कोणतीही कारवाईची भूमिका घेतलेली नाही. उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी मल्लिकार्जून या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत. संपूर्ण तपशीलाच्या आधारावर आपण निश्चितच अधिकृत कारवाईची माहिती देऊ, असे आश्वासन देणाऱ्या मल्लिकार्जुन यांनी फोन आणि भ्रमणध्वनी संदेशाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.
Join Our WhatsApp Community