मुंबई महापालिकेचे सहआयुक्त विजय बालमवार यांच्याकडे पुन्हा एकदा महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजय बालमवार यांची यापूर्वी उपायुक्त (विशेष) या पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही दिवसातच ही बदली रद्द करून पुन्हा एकदा परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी त्यांची बदली करतानाच त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचा पदभार सोपवला होता. पण आता पुन्हा एकदा विजय बालमवार यांना परिमंडळ चार मधून हटवून आता त्यांच्याकडे मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वारंवार यांच्याकडे सहआयुक्त मध्यवर्ती खरेदी विभाग व समन्वय अधिकारी व संपर्क अधिकारी मागासवर्ग पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांना दिलासा नाहीच! तुरूंगातील मुक्काम वाढला; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला)
मुंबई महापालिकेतील सह आयुक्त आणि उपायुक्त तथा सह आयुक्त यांच्याकडे यांच्याकडील खात्यांचा खांदेपालट मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहेत आणि या बदल्या केल्यानंतर पुन्हा त्याच बदल्या रद्द करण्यात येत असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊ लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यावर स्पष्टीकरण देत या रुटीन बदल्या असून यामध्ये कोणतेही राजकीय हस्तक्षेप तथा दबाव नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु या सगळ्या बदल्यांचे सत्र थांबलेले असतानाच पुन्हा एकदा सह आयुक्त विजय बालमवार यांना परिमंडळ ४च्या उपायुक्त पदावरून हटवून आता त्यांच्याकडे मध्यवर्ती खरेदी विभाग यांची जबाबदारी सोपवली आहे.
बालमवार यांच्या जागी आता परिमंडळ पाच चे उपायुक्त असलेल्या विश्वास शंकरवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे विश्वास शंकरवार यांची परिमंडळ पाचचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त असलेले हर्षद काळे यांची बदली परिमंडळ पाचच्या उपयुक्त पदी करण्यात आली आहे. त्यामुळे तीन उपायुक्तांवरील जबाबदारीचा खांदेपालट करण्यात आल्यानंतर पुन्हा या बदल्या रद्द होणार नाही याची धागधुग आता इतरांना लागली आहे.
विशेष म्हणजे उपायुक्त मध्यवर्ती खरेदी विभागाचे रमाकांत बिरादार यांची बदली परिमंडळ दोन मध्ये करण्यात आल्यानंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांची अवघ्या काही महिन्यांपूर्वीच बदली करून त्यांच्याकडे मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र काळे यांच्याकडून ही जबाबदारी काढून काही महिन्यातच त्यांची बदली परिमंडळ पाचच्या उपायुक्त पदी करून त्या जागी बालमवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीपूर्वीच या बदल्या करण्यात आल्याने आता यात कुणाचा दबाव असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community