महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला दमदार यश मिळाले असून, कोकणातही भाजप पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे कोकण हा आमचाच बालेकिल्ला असल्याचा सातत्याने दावा करणाऱ्या शिवसेनेला या निकालामुळे चोख प्रत्युत्तर मिळाले असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.
ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ५७४ ग्रामपंचायतींपैकी १९० ठिकाणी विजय मिळवत भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. पंचायत ते संसदेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यापुढेही भाजप विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
कोकणामध्ये भाजपाची आता अतिशय प्रभावीपणे संघटनात्मक व राजकीयदृष्टया पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचयातीच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे दमदार यश प्राप्त झाले आहे, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
Join Our WhatsApp Community