बेस्टच्या दुमजली बसमधून अनुभवता येणार यंदाची दिवाळी पहाट

169

दिवाळीच्या सुट्टया लक्षात घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबईकरांना आणि पर्यटकांना सकाळचे मुंबईचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीकोनातून बेस्ट उपक्रमाने २२ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी ७ वाजल्यापासून दर एक तासाने हेरिटेज पर्यटन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना यंदाची दिवाळी पहाट बेस्टच्या दुमजली बसमधून अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

( हेही वाचा : पीएफआयच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानी; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड)

या मार्गावरून घडवते मुंबईचे दर्शन

मुंबई शहरामध्ये दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे भारतीय नागरीक देखील पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईला भेट देत असतात. या सर्वांसाठी बेस्ट उपक्रमाने ३ नोव्हेंबर २०२१ पासून दररोज सायंकाळी प्रेक्षणीय स्थळे आणि प्राचीन वास्तूंचे दर्शन घडविणारी हेरिटेज पर्यटन बससेवा सुरु केली आहे. या पर्यटन बससेवा खुल्या दुमजली बसगाडीतून गेट वे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युशियम, मंत्रालय, विधान भवन, एन.सी.पी.ए. मरिन ड्राइक, चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, राजाबाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया एशियाटीक लायब्ररी आणि जुने कस्टम हाऊस अशा विविध स्थळांचे दर्शन घडविते.

मध्यरात्री पर्यंत दर तासाला आहेत या बस फेऱ्या

सुरुवातीला सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.०० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बस सेवा शनिवार आणि रविवार यादिवशी उपलब्ध होती. या बस सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन नरिमन पॉईंट येथून दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता अशाप्रकारे दोन अतिरिक्त बसफे-यांच्या स्वरुपात नरिमन पॉईंट येथून सुरु झाली आणि मध्यरात्रीपर्यंत दर तासाला ही सुविधा दररोज उपलब्ध असते.

२२ ऑक्टोबर पासून सकाळीही हेरिटेज पर्यटन सेवा

त्यानंतर शनिवार २७.११.२०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी साडे नऊ आणि अकरा वाजताही दोन अतिरिक्त बसफे-या बेस्ट उपक्रमामार्फत सुरु केल्या. आता दिवाळीच्या सुट्टया लक्षात घेऊन प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबईकरांना आणि पर्यटकांना सकाळच्या मुंबईचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीकोनातून बेस्ट उपक्रमाने २२ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी ७.०० वाजल्यापासून दर एक तासाने सदर हेरिटेज पर्यटन सेवा सुरु करण्याचे नियोजित केले असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. या सकाळच्या हेरिटेज पर्यटन सेवा द्वारे मुंबईकर आणि पर्यटकांना यंदाची दिवाळी पहाट बेस्टच्या दुमजली बसमधून अनुभवता येईल, असा विश्वास बेस्ट उपक्रमाने व्यक्त केला आहे.

कसा साधाल संपर्क

पर्यटकांना तिकीट विक्रीसाठी तसेच अन्य माहितीकरिता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक या ठिकाणी संपर्क साधता येईल. त्याशिवाय बेस्ट उपक्रमाचा टोल फ्री क्रमांक १८०० २२७५५० आणि ०२२२४१९०११७ या दूरध्वनी क्रमांकावर देखील या पर्यटन सेवेविषयी माहिती मिळू शकेल. सदर तिकीट Book My Show App वर सुध्दा उपलब्ध आहे. तरी, सर्व मुंबईकर जनतेने आणि पर्यटकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.