राज्यात कोरोनाचे तीन नवे विषाणू आढळलेले असताना रायगड, ठाण्यासह मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याबाबत राज्य आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या साप्ताहिक आजारांच्या अहवालात मुंबईत डेंग्यू आणि स्वाईन फ्लू वाढत असल्याबाबत पालिका आरोग्य विभागाने माहिती दिली. मुंबईत डेंग्यूचे १७८, तर मलेरियाचे १७७ रुग्ण सापडले आहेत तसेच १३ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. पाऊस आणि आता नुकतीच सुरु झालेली ऑक्टोबर हिट यामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण पुन्हा वाढतील का, याबाबत पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे.
( हेही वाचा : दिवाळीत कोविड-१९ ची पुन्हा भीती; नागरिकांनी भेटीगाठीत प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन )
ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील परतीच्या पावसामुळे आजारांना पुन्हा निमंत्रण मिळाल्याचे पालिकेच्या साप्ताहिक आजारांच्या आकडेवारीतून पाहायला मिळाले. मात्र सप्टेंबर महिना सरताच मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या इतर आजारांच्या तुलनेत आटोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हेपेटायटीसचाही रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
कशी काळजी घ्यावी ?
- परिसर स्वच्छ ठेवा. भांडी तसेच कुंडीतील साचलेले पाणी सतत बदला.
- शरीर झाकणारे पूर्ण कपडे परिधान करा.
- गर्दीच्या स्थळांना भेट देणे टाळा.
- नाक, घसा आणि तोंडाला हाताने स्पर्श करु नका.
- स्वतःहून औषधांचे सेवन करणे टाळा. ताप आणि श्वसनाचा त्रास उद्भवल्यास तातडीने पालिका रुग्णालये किंवा दवाखान्यांना भेट द्या.