हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत सरकार स्थापन केलेल्या शिंदे गट आणि भाजपामध्ये आता शह-काटशाहाचे राजकारण सुरू झाले आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी थेट मित्रपक्ष भाजपाचा महामंत्री गळाला लावल्यामुळे शंकेस वाव मिळाला आहे. परंतु, शिंदे गटाच्या या कृतीमुळे भाजपामधील वरिष्ठ नेते नाराज असल्याचे कळते.
काहीही झाले तरी एकमेकांचे नेते-कार्यकर्ते फोडू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांनी शिंदे-फडणवीसांना दिल्या होत्या. तरीही शिंदे गटाने हा आदेश धुडकवला. मुंबई पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला. आधीच सत्तारांचे मंत्रिमंडळात असणे भाजपला मान्य नसताना, त्यांच्या या कृतीमुळे भाजपाचे नेते आणखी नाराज झाल्याचे कळते.
मनीषा चौधरींवर टीका
भाजपा सोडून शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेल्या राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्यावर आरोप केले आहेत. आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे. आम्ही महिला नेत्यांच्या कार्यालयात जायचो, तेव्हा भेट दिली जायची नाही, कार्यालयात बसूही दिले जात नव्हते, असाही आरोप रेखा यादव यांनी केला आहे.
( हेही वाचा: ठाकरे कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल )
युतीचा प्रचार करू – यादव
आमची काही नेत्यांवर नाराजी असली, तरी राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गट महापालिकेत जो उमेदवार देतील, त्याला जिंकवू, असे राम यादव यांनी सांगितले. रेखा यादव प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष नगरसेविका होत्या, तर राम यादव हे भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री होते. शिंदे गटाने या दोघांनाही महापालिका निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.