ऋतुजा लटकेंसमोर ‘नोटा’चेच आव्हान

136

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुतील चुरसच संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह दोन नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि चार अपक्ष निवडणूक रिंगणात असले तरी ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होणार आहे. लटके वगळता प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांना मतदानाचा एकूण ५ हजारांचाही टप्पा गाठता येणार नाही, अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यासर्वांना मिळणाऱ्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक असतील. त्यामुळे लटके यांच्यासमोर ‘नोटा’चे आव्हान असेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : भाजप बेस्ट कामगार संघाचा वेतन करार पूर्ण; अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय )

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके तसेच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यासह इतर नोंदणीकृत पक्षाचे ३, तर ९ अपक्षांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. पटेल यांच्याबरोबरच हिंदुस्थान जनता पार्टीचे राकेश अरोरा आणि निकोलस अल्मेडा, साकिब मल्लिक,चंद्रकांत मोटे, पहलसिंग आऊजी, चंदन चतुर्वेदी आदी ७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले.

परंतु ऋतुजा लटके यांच्यासोबत आता ‘आपकी अपनी पार्टी-पीपल्स’चे बाला नाडर, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज नायक तसेच नीना खेडेकर, फरहान सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाटी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. लटके यांच्यासमोर उभे असलेल्या सर्व उमेदवारांचा तसा कोणताही प्रभाव नसून स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, यासर्वांना एकूण पाच हजारांचा पुढे मते पडणार नाही. मात्र, भाजपचे मुरजी पटेल हे निवडणूक रिंगणात असते तर शिवसेनेला खूप मेहनत करावी लागली असती. तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या निकोलस अल्मेडा यांनी जर अर्ज मागे घेतला नसता तर त्यांनाही पाच त दहा हजार मते निश्चितच मिळाली असती,असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांचा विजय पूर्णपणे दृष्टीक्षेपात असून केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाणार आहे. भाजपने आपला उमेदवार न दिल्याने ते आपला मत कुणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. अनेक पक्षांचे उमेदवार नसले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान करावेच लागणार आहे. अशा परिस्थितीत ‘नोटा’चा वापर मतदार करू शकतात. त्यामुळे लटके यांच्यासमोर आता ‘नोटा’चे आव्हान असून इतर उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक असतील तर लटके यांच्या बरोबरच ‘नोटा’च्या पारड्यात किती मतांची नोंद होते याची सर्वांना उत्सुकता आहे. मागील काही निवडणुकीतुन मतदारांचा कल हा नोटा कडे असून त्यामुळे प्रत्येक निवडणुकी ‘नोटा’ ला प्राधान्य देणाऱ्या मतदारांची संख्या वाढल्याने या निवडणुकीत ‘नोटा’ कडे अधिक कल असेल असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.