ठाण्यातील ‘या’ खारफुटींवर मैदान बनवण्यासाठी दिवसाढवळ्या डेब्रिजचा भराव

135

भिवंडीतील केवनी या संरक्षित खारफुटींवर दिवसाढवळ्या माती आणि डेब्रिजचा कचरा टाकणा-या दोन जणांवर कांदळवन कक्षाने बुधवारी कारवाई केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास डंपरच्या साहाय्याने खारफुटींवर भराव टाकला जात होता. या प्रकाराची माहिती मिळताच कांदळवन कक्षाने तातडीने घटनास्थळी भेट देत दोन आरोपींना अटक केली. चौकशीअंती केवनीतील स्थानिकांनाच खारफुटींवर भराव टाकून भलेमोठे मैदान बनवायचे होते, अशी माहिती वनाधिका-यांना मिळाली.

(हेही वाचा – सुषमा अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सूचक इशारा देत म्हणाल्या…)

केवनीतील खारफुटींना २०१५ साली संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला. या भागांत बुधवारी सकाळी हायवा डंपर वाहन माती व डेब्रिजचा कचरा टाकून भराव टाकत होते. वनाधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून भराव टाकण्यापासून दोन आरोपींना रोखले. या प्रकरणी डंपरचालक योगेश कुमार, मदतनीस राकेश कुमार यांच्यावर वनाधिका-यांनी गुन्हा नोंदवला. डंपर जप्त करुन कादंळवन कक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आला.

दोघांनीही भराव टाकण्याचे काम बुधवारपासूनच सुरु केले होते, असा दावा केला. वनाधिकारी पोहोचेपर्यंत पाचशे स्वेकअर मीटर खारफुटीच्या जमिनीवर अगोदरच भराव टाकला गेला. स्थानिकांना या भागांत मोठे मैदान बनवायचे होते. त्याकरिता दोघांना खारफुटींवर भराव टाकून मैदान बनवण्याचे कंत्राट मिळाल्याची माहिती आरोपींच्या जबाबातून मिळाली, अशी माहिती ठाण्याचे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांनी दिली. येत्या दोन-तीन दिवसांत आरोपींकडून ज्या स्थानिकांची नावे मिळाली आहेत, त्यांच्याविरोधात नोटीसा बजावल्या जातील, असेही खाडे यांनी स्पष्ट केले.

कारवाईचे पथक 

ही कारवाई कांदळवन कक्षाचे विभागीय वनाधिकारी आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक मगदूम, ठाण्याचे वनक्षेत्रपाल विक्रांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपाल रवींद्र शिंदे, वनरक्षक खारबाव, कशेळीचे वनरक्षक प्रियांका दारकुंडे, खारबावचे वनरक्षक परशुराम शिंदे आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.