अमित ठाकरेंचं पोलिसांसाठी उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र; म्हणाले, “सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा…”

127

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत देत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी राज्यातील पोलिसांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलिसांसाठी एक पाऊल पुढे आले आहेत. दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यानिमित्त राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना एका पगारा इतका बोनस द्या, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

या पत्रात राज्यातील पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी आणि पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशा आशयाचे पत्र लिहीत अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

(हेही वाचा – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली महत्वाची मागणी)

काय म्हटले अमित ठाकरेंनी पत्रात?

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते!

हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील…. फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील… पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय.

माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी.

धन्यवाद.

letter

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.