पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील 75 हजार तरुणांना सरकारी नोकरीचे गिफ्ट देणार आहे. आगामी 22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधणार असून 75 हजार तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देणार आहेत.
( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात ७५ हजार पदांसाठी मेगाभरती होणार)
डिसेंबरपर्यंत 10 लाख नोकऱ्या देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या जून महिन्यात सांगितले होते की, देशातील तरुणांना आगामी डिसेंबरपर्यंत 10 लाख नोकऱ्या दिल्या जातील. त्यानुसार आगामी 22 ऑक्टोबर रोजी 75 हजार तरुणांना संरक्षण, रेल्वे, पोस्ट, गृह मंत्रालय, सीआयएसएफ, श्रम आणि रोजगार, सीबीआय, सीमाशुल्क विभाग, बँका, सीएएफ इत्यादी विविध मंत्रालयांमध्ये या नोकऱ्या दिल्या जातील. देशातील विविध शहरातील केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबतच खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ओरिसातून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गुजरातमधून, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर चंदीगडमधून, वाणिज्य मंत्री पियुष गोयल महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत. राजस्थानमधून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशातून अवजड उद्योगमंत्री महेंद्र पांडे, झारखंडमधून अर्जुन मुंडा, बिहारमधून गिरीराज सिंह सहभागी होणार आहेत.
याशिवाय 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 4.50 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशात आभासी पद्धतीने सहभागी होतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले होते की, 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतना जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या 4.50 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशात व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत.
Join Our WhatsApp Community