भाजपचे माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात अडकले, ठाकरे गटाची खेळी

130

शिवसेनेत झालेल्या उठावानंतर आता शिवसेनेचे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाला गळती लागलेली असून शिंदे गटाची ताकद वाढत आहे. पण आता भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

देशमुख यांचा पक्षप्रवेश

शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघातील भाजपचे माजी मंत्री आणि नेते संजय देशमुख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गेल्या महिन्यात अकोला येथे देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे तेव्हापासून संजय देशमुख हे उद्धव ठाकरे गटात सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते.

राठोडांना आव्हान

दिग्रस मतदारसंघात संजय राठोड आणि संजय देशमुख हे मोठे नेते आहेत. राठोड यांनी देशमुख यांचा पराभव केल्यामुळे आता मतदारसंघावर संजय राठोड यांचे वर्चस्व आहे. पण आता देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे दिग्रस मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा जंगी सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड यांना आव्हान निर्माण करण्यासाठी ठाकरे गटाकडून ही खेळी खेळण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.