रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींच्या कागद निर्मिती प्रकल्पाला मान्यता

125

रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींच्या कागद निर्मिती प्रकल्पाला गुरुवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सिनारमन्स पल्प कंपनी कोकणात ही गुंतवणूक करणार आहे.

कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात, राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्याकरिता औद्योगीक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाय राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठी चालना देण्यासाठी महत्वपूर्ण उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

( हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक; लटकेंसाठी नाही तर मशालीसाठी मतदान वाढवण्याचा ठाकरे शिवसेना गटाचा प्रयत्न)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची तिसरी बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, औद्योगीक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

इंडोनेशियातील कंपनीची गुंतवणूक

  • सिनारमन्स पल्प ॲण्ड पेपर प्रा. लि. (एशिया पेपर ॲण्ड पल्प) हा आ‍‍शियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे.
  • हा उद्योग भारतात प्रथमच वीस हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. इंडोनेशियातील हा समुह भारतात पहिल्यांदाच असा प्रकल्प आणि तोही महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
  • त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे या प्रकल्पासाठी यापुर्वीच तीनशे एकर जागा देण्यात आली असून, प्रकल्पाच्या मागणीनुसार अधिकची जागा देण्याचा शासनाचा मानस आहे.
  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देताना प्रकल्पस्थळ व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढणारे उद्योग व त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी रोजगार निर्मिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उप समितीने या प्रकल्पाला मान्यता देऊन, राज्यात नव्हे तर देशात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प मिळविण्यात पहिले स्थान मिळवले आहे.

जळगावातही विशेष प्रक्रिया उद्योग

  • जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रा. लि. हा उद्योग समुह या जळगाव जिल्ह्यातील खडका किन्ही (ता. भुसावळ) येथे केळीच्या टाकाऊ भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहे.
  • हा जगातील अशा प्रकारच्या उत्पादनाचा एकमेव पेटंट धारक उद्योग असून तो इको फ्रेंडली तंत्रज्ञानावर आधारीत जगातील या पहिलाच प्रकल्प राबवित आहे.
  • हा उद्योग सुरवातीच्या टप्प्यात ६५० कोटी आणि नंतर पुढच्या टप्प्यात ही गुंतवणूक एक हजार कोटी पर्यंत करणार आहे.
  • या उद्योग प्रकल्पासाठी औद्योगिक विकास अनुदान कालावधी १० वर्षावरुन ३० वर्षे वाढविण्यास तसेच १२० टक्के दराने औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

अनुदान देय मर्यादा १२.५ टक्के

बैठकीत राज्यातील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लि. पुणे, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लि. नाशिक, जिंदाल पॉलिफिल्म लि. नाशिक व जेएसडब्ल्यु डोलवी, रायगड या उद्योगांची वार्षिक सरासरी अनुदान देय मर्यादा १२.५ टक्के प्रमाणेच करण्याचा उच्चाधिकार समितीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.